दिगंबर कामत, तवडकर मंत्रिपदी निश्चित
पुढील आठवड्यात पुनर्रचना शक्य: सभापती तवडकर दिल्लीला रवाना: नवे सभापती फळदेसाई ?
विशेष प्रतिनिधी/पणजी
डॉ. प्रमोद सावंत मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुढील आठवड्यात निश्चित होईल. दोन मंत्र्यांना घेऊन पुनर्रचना करण्यात येणार आहे. विद्यमान सभापती रमेश तवडकर यांच्यावर मंत्रिपद स्वीकारण्याचा दबाव भाजपने वाढविला आहे. दिगंबर कामत हे दुसरे मंत्री असतील. दरम्यान, सभापती रमेश तवडकर हे आज तातडीने दिल्लीला रवाना होत असून ते अगोदर राष्ट्रपतींना भेटतील आणि त्यानंतर ते पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन परवा गोव्यात परत येतील.
राज्याच्या राजकारणात काही प्रमाणात बदल अपेक्षित असून मंगळवार, बुधवारच्या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडतील, असा अंदाज आहे. यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी भारतीय जनता पक्ष केवळ दोन मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करणार आहे. रमेश तवडकर आणि दिगंबर कामत अशी या दोघा नेत्यांची नावे आहेत. सभापती रमेश तवडकर यांनी आपल्या निर्णयात बदल केला असून आपल्याला कृपया सभापतीपदीच राहू द्या, अशी विनंती त्यांनी पक्षाला केली. या संदर्भात गेल्या दोन दिवसांत सभापतींची मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणी झाली. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षांबरोबरदेखील बोलणी झालेली आहे. मात्र सभापती रमेश तवडकर यांचा पक्षाशी असलेला संबंध आणि संघटनात्मक कार्य यांचा विचार करता सभापतीपदी राहून ते पक्षाचे काम करू शकत नसल्याने गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांचा पक्षाशी फारसा निकट संबंध आलेला नाही आणि त्यांच्या अनुभवाचा वापर भाजपला करण्याची इच्छा आहे त्यामुळेच सभापतीपदाचा राजीनामा देऊन त्यांनी मंत्रीपद स्वीकारावे ही पक्ष श्रेष्ठींची सूचना त्यांना कळविली परंतु आपण ज्या पदावरती आहोत ते पद घटनेतील महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाची शान राखण्यासाठी आपल्याला त्या पदावर राहू द्या, निवडणुकीनंतर पाहू काय करता येईल ते, असे तवडकर यांनी पक्षाला कळविले आहे, परंतु पक्ष ते ऐकण्यास तयार नाही. त्यांच्यावर सभापतीपदाचा राजीनामा देण्याकरिता सध्या तरी दबाव येत आहे. आपण पक्षाशी एकनिष्ठ आहे, असे अलीकडेच पुन्हा एकदा त्यांनी निवेदन केले होते आणि पक्षश्रेष्ठींचा निर्णय हा स्वीकारावा लागतो. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाबाहेर आपण जाऊ शकत नाही, असे सभापती म्हणाले. या पार्श्वभूमीवर सभापती तवडकर हे आज नवी दिल्लीला जात आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांच्या निमंत्रणावरून दिल्लीला जात आहेत. आपल्या दिल्ली दौऱ्यामध्ये ते राष्ट्रपतींबरोबर
चर्चा करतील. देशातील काही नेत्यांना राष्ट्रपतींनी बोलाविले असून त्यांच्याबरोबर रमेश तवडकर यांनाही बोलावून घेतले आहे. राष्ट्रपतींबरोबर चर्चा झाल्यानंतर तवडकर हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील कदाचित ते केंद्रीय गृहमंत्र्यांची देखील भेट घेऊ शकतील. त्यांच्या दरम्यान चर्चा झाल्यानंतरच सभापतीपदाचा राजीनामा द्यायचा के त्याच पदावर रहायचे याबाबत सभापती निर्णय घेतील गोव्यात आल्यानंतर ते कदाचित सभापतीपदाचा राजीनामा देऊ शकतील.
दिगंबर कामत आणि रमेश तवडकर हे दोन नवे मंत्री !
राज्य मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत भाजपच्या नेत्यांनी नवी दिल्लीहून कळविल्याप्रमाणे मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर या दोघांचा समावेश करण्यात येणार आहे. तिसऱ्या मंत्र्यांचे अद्याप नाव नाही. त्यामुळे मायकल लोबो यांना संधी मिळेल की नाही याबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे. सारा निर्णय आता रमेश तवडकर यांच्यावर अवलंबून आहे त्यांनी मान्यता दिली तर पुढील दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचना होऊ शकते. मंत्रिमंडळाचे घोडे हे सभापतीपदावर अडलेले आहे.
नव्या सभापतीपदासाठी तीन नावे
रमेश तवडकर यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्या जागी सभापती कोण असा जो प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावर सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरे नाव आहे कुडचडेचे नीलेश काब्राल व तिसरे नाव आहे गणेश गावकर यांचे. मात्र आता रमेश तवडकर यांनी मान्यता दिली तर याबाबत पक्षश्रेष्ठी त्वरित निर्णय घेतील.