सहलींसाठी सरकारी बस मिळणे अवघड
अधिवेशनामुळे सरकारी बसेसची कमतरता : बुकिंगसाठी शिक्षकांची धावपळ
प्रतिनिधी/ बेळगावSSSSS
शालेय विद्यार्थ्यांना सध्या ओढ लागली आहे ती सहलींची. परंतु सहलींसाठी सरकारी बस उपलब्ध होत नसल्याने शिक्षकांची तारेवरची कसरत सुरू आहे. परिवहन मंडळाच्या कार्यालयाचे शिक्षकांना उंबरठे झिजवावे लागत आहेत. सहलींसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना त्यातच बेळगावमध्ये होणाऱ्या अधिवेशनामुळे सरकारी बस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांची सहल काढली जाते. राज्यांतर्गत सहली काढण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. तर राज्याबाहेरील सहलींसाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी गरजेची आहे. अनेक हायस्कूल तीन ते चार दिवसांच्या बाहेरील राज्यांच्या सहली काढत आहेत. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गोवा व कर्नाटकातील पर्यटनस्थळांचा यामध्ये समावेश आहे.
सहलींचे नियोजन झाल्यानंतर परिवहन मंडळाकडे बसची चौकशी करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना बसची उपलब्धता नसल्याने माघारी फिरावे लागले. परिवहन मंडळाच्या डेपो क्र. 1 व 2 मधील सहलींसाठीच्या राखीव बस 4 डिसेंबरपर्यंत फुल्ल झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षकांना नाईलाजास्तव खासगी बस बुकिंग कराव्या लागत आहेत. तसेच 8 डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होणार असल्याने बस उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बुकिंगसाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे.
परिवहन मंडळाने राज्यांतर्गत प्रवासासाठी प्रतिकिलोमीटर 54 रुपये असा दर निश्चित केला आहे. तर राज्याबाहेरील प्रवासासाठी प्रतिकिलोमीटर 57 रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी किमान रोज 350 किलोमीटर प्रवास होणे गरजेचे आहे.