For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व्हरडाऊनमुळे जन्म-मृत्यू दाखला मिळणे कठीण

11:05 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्व्हरडाऊनमुळे जन्म मृत्यू दाखला मिळणे कठीण
Advertisement

सोमवारी दिवसभर नागरिकांना नाहक त्रास

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेतील सर्व्हरडाऊन समस्येमुळे जन्म आणि मृत्यू दाखला मिळणे अवघड झाले. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिवसभर ताटकळत थांबावे लागले. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. केवळ अर्ज घेवून त्याची नोंद केली. मात्र कोणालाही जन्म व मृत्यू दाखला मिळाला नाही. यामुळे दिवसभर ताटकळून जनतेला रिकाम्या हाती परतावे लागले. जन्म, मृत्यू दाखल्यासाठी महानगरपालिकेसमोर नेहमीच गर्दी होत असते.शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे सोमवारी गर्दी होणार म्हणून आरोग्य विभागातील कर्मचारी सकाळी 8.30 वाजताच उपस्थित होते. मात्र सकाळपासूनच येथील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. काही वेळात सुरू होईल, या आशेवर अनेक जण ताटकळत थांबले होते. मात्र रिकाम्या हातीच त्या सर्वांना माघारी फिरावे लागले.

बेंगळूर येथूनच समस्या

Advertisement

सध्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश सुरू आहे. त्यामुळे जन्म दाखला आवश्यक आहे. जन्म दाखल्यामध्ये चुका दुरुस्त करून घेण्यासाठीही त्या ठिकाणी गर्दी होत आहे. पण सर्व्हर समस्येमुळे या सर्वांनाच अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना विचारले असता बेंगळूर येथूनच  समस्या निर्माण झाली आहे. केवळ महानगरपालिकाच नाही तर इतर विभागामध्येही सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण झाली आहे, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळी लवकर कार्यालय सुरू

दोन दिवस सुट्टी असल्यामुळे दि. 24 रोजी जन्म, मृत्यू दाखल्यासाठी गर्दी होणार याची कल्पना आम्हा सर्वांनाच होती. कोणाचीही कामे तटू नयेत, यासाठी स. 8.30 वाजताच आम्ही कार्यालय सुरू केले. मात्र बेंगळूर येथूनच सर्व्हरडाऊनची समस्या झाल्याने आमचा नाईलाज झाला, असे मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.