For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये मतभिन्नता

06:55 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये मतभिन्नता
Advertisement

कमलनाथ, आनंद शर्मा, थरूर यांचे सरकारला समर्थन : राहुल गांधींच्या विचारांपासून अलिप्तता दाखवल्याचे स्पष्ट

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात एलपीजीचे संकट निर्माण झाले आहे. या मुद्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पडली आहे. एकीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर आणि संकट व्यवस्थापनावर टीका करत असतानाच दुसरीकडे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते सरकारच्या भूमिकेचे कौतुक करत आहेत. कमलनाथ, आनंद शर्मा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेस नेतृत्वाच्या अडचणी वाढल्या आहेत. राहुल गांधींनी अमेरिका-इस्रायल-इराण युद्धावरील भारताच्या परराष्ट्र धोरणाला ‘तडजोड करणारे’ म्हटले, तर त्यांच्याच पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी त्याला ‘जबाबदार राजकारण’ असे संबोधले आहे.

Advertisement

मध्य-पूर्वेतील युद्ध आणि एलपीजी संकटावर काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने कमलनाथ, आनंद शर्मा, मनीष तिवारी आणि शशी थरूर यांचा समावेश आहे. राहुल गांधींनी केंद्र सरकारला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा निषेध करण्याचे आवाहन करत असतानाच काँग्रेस नेते आनंद शर्मा आणि कमलनाथ यांनी सरकारचे कौतुक केले. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी एका टीव्ही वृत्तवाहिनीवर पश्चिम आशियातील युद्धाबद्दल बोलताना सरकार योग्य पावले उचलत असल्याचे स्पष्ट केले.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही एलपीजीच्या तुटवड्यावर आपल्याच पक्षाच्या भूमिकेशी असहमती दर्शवली. ‘सध्या देशात असा कोणताही तुटवडा नाही. केवळ तुटवडा असल्याचे वातावरण तयार केले जात आहे’, असे कमलनाथ म्हणाले. कमलनाथ यांनी काही लोकांवर राजकीय फायद्यासाठी जाणूनबुजून घबराट निर्माण केल्याचा आरोप केला. तथापि, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची कमतरता नाही हे काँग्रेस नेते स्वत:च मान्य करत असल्याचे ट्विट केले होते. मात्र, राहुल गांधी या मुद्यांवरून थेट पंतप्रधानांवर नाव घेऊन निशाणा साधताना दिसत आहेत.

‘भारताचा संयम शहाणपण दाखवतो’ : थरुर

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी आपल्या एका लेखामध्ये पश्चिम आशिया संकटावरील भारत सरकारच्या संयमी भूमिकेचे समर्थन करताना याला जबाबदार व धोरणात्मक मुत्सद्देगिरी म्हटले होते. ‘या प्रकरणात मौन बाळगणे म्हणजे भित्रेपणा नव्हे. उलट, आपण हे समजून घेतले पाहिजे की आपले राष्ट्रीय हित या प्रदेशाशी जोडलेले आहे,’ असे स्पष्टपणे नमूद केले होते.

यापूर्वी ऑपरेशन सिंदूरवरही वेगवेगळी भूमिका

यापूर्वी, काँग्रेस नेते शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’संबंधी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी विधाने केली होती. मात्र, पक्षाने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या दोन नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे पक्षाला यापूर्वीही नामुष्कीचा सामना करावा लागला आहे. संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान पक्षाने या दोन नेत्यांना बाजूला सारले होते. आता आणखी दोन नेत्यांनी पक्षाच्या निश्चित भूमिकेपेक्षा वेगळी विधाने केली आहेत.

Advertisement
Tags :

.