For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराण युद्धावरून ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात मतभेद

07:00 AM May 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराण युद्धावरून ट्रम्प नेतान्याहू यांच्यात मतभेद
Advertisement

अमेरिकेला हवाय शांतता करार : हल्ले न रोखण्याचा इस्रायलचा आग्रह

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन, तेल अवीव

इराण युद्धावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. इराणवरील हल्ले जारी रहावेत अशी नेतान्याहू यांची इच्छा आहे, तर ट्रम्प हे सध्या चर्चा आणि कराराला संधी देऊ इच्छितात. दोन्ही नेत्यांदरम्यान मंगळवारी सुमारे एक तासापर्यंत फोनवरून चर्चा झाली. इराणवरील प्रस्तावित हल्ले रोखणे चूक असून सैन्य कारवाई जारी रहायला हवी, असे नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले असल्याचे समजते.

Advertisement

तर ट्रम्प यांनी रविवारी अमेरिका इराणवर नव्या टार्गेटेड हल्ल्यांची तयारी करत असल्याचे नेतान्याहू यांना सांगितले होते. या ऑपरेशनला ‘स्लेजहॅमर’ नाव दिले जाणार होते. परंतु त्याच्या 24 तासांनी ट्रम्प यांनी प्रस्तावित हल्ले रोखण्यात आल्याची घोषणा केली होती. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यासारख्या आखाती देशांच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.

केवळ कूटनीतिनेच तोडगा शक्य

इराण संकटाचा तोडगा केवळ कूटनीतिनेच निघू शकतो, यात इराणच्या हितांचा सन्मान केला जाण्याची आवश्यकता आहे. चर्चेद्वारे होणाऱ्या कुठल्याही कराराला लागू करविण्यास मदतीसाठी रशिया तयार आहे. इराण संकटावर तोडगा सैन्य किंवा दबावाच्या धोरणातून नव्हे तर कूटनीतिक चर्चेतून काढला जावा, असे रशियाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी म्हटले आहे.

कॅनडाकडून इस्रायली राजदूताला पाचारण

गाझाच्या दिशेने जाणाऱ्या ग्लोबल फ्लोटिलावरील कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेप्रकरणी कॅनडाने इस्रायलच्या राजदूताला पाचारण केले आहे. कॅनडाच्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षामंत्री इतामार बेन-ग्विर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओचा उल्लेख कार्नी यांनी केला आहे. या व्हिडिओत ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांसोबत गैरवर्तन होत असल्याचे दिसून येते. कॅनडाने यापूर्वी बेन-ग्विर यांच्यावर कठोर निर्बंध लादले आहेत. यात संपत्ती गोठविणे आणि प्रवासबंदी सामील आहे. फ्लोटिला आयोजकांनुसार सहाय्य अभियानात कॅनडाचे 11 नागरिक सामील होते. हे कार्यकर्ते गाझासाठी मदतसामग्री घेऊन जात होते.

इस्रायलकडून ड्रोन हल्ले

इस्रायलने दक्षिण लेबनॉनच्या अनेक भागांमध्ये ड्रोन हल्ले आणि तोफगोळ्यांचा मारा केला आहे. सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार आणि बॉम्ब पाडविण्यात आल्याने तणाव वाढला आहे. टायर जिल्ह्यातील तोरा आणि जेनाता या ठिकाणांना जोडणाऱ्या मार्गाला इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आले. मरजायौन जिल्ह्यातील काबरिखा या भागाला लक्ष्य करत तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. इस्रायली ड्रोननी अल-हन्निये भागात साउंड बॉम्ब पाडविले आहेत. या बॉम्बचा वापर तीव्रस्फोट आणि दहशत निर्माण करण्यासाठी केला जातो.

Advertisement
Tags :

.