For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युरोपला होणारा डिझेल पुरवठा 90 टक्क्यांनी प्रभावीत

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
युरोपला होणारा डिझेल पुरवठा 90 टक्क्यांनी प्रभावीत
Advertisement

लाल समुद्रातील  हल्ल्यांमुळे शिपिंग शुल्क वाढले : आता आशियातील देशांमध्येच होणार वितरण

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारतातून युरोपला डिझेलचा पुरवठा गेल्या दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकन मीडिया ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, लाल समुद्रात हौथींच्या सततच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर गंभीर परिणाम होत आहे. आशियातून युरोपियन युनियन (ईयू) आणि ब्रिटनमध्ये जाणाऱ्या मालवाहतुकीचे शुल्क वाढले आहे. अशा परिस्थितीत पाश्चात्य देशांऐवजी आशियामध्ये माल पाठवणे अधिक किफायतशीर झाले आहे. ब्लूमबर्गने व्होर्टेक्सा लिमिटेडच्या डेटाचा हवाला देत म्हटले-फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात भारतातून दररोज सुमारे 18 हजार बॅरल डिझेल युरोपमध्ये पोहोचले. हे जानेवारीतील सरासरी वितरणापेक्षा सुमारे 90 टक्के कमी आहे. 6 फेब्रुवारी रोजी भारतात येणाऱ्या स्टार नासिया या अमेरिकन जहाजावर  हल्ला झाला होता. हौथींच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या बंदरातून जहाजे जात आहेत. स्पार्टा कमोडिटीजचे विश्लेषक नोएल-बेस्विक म्हणाले- सिंगापूरसारख्या पूर्वेकडील देशांची निर्यात पाश्चिमात्य देशांपेक्षा खूपच चांगली झाली आहे. हौथींच्या भीतीमुळे युरोप किंवा अटलांटिक बेसिनच्या दिशेने जाणाऱ्या टँकरना दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपमधून जावे लागते आहे.

Advertisement

यामुळे वाहतुकीचे एकंदर अंतर वाढले असून, त्याचा थेट परिणाम वाहतुक खर्चावर होत आहे. तसेच, अनेक वेळा त्यांना सुएझ कालव्याचा मार्ग स्वीकारावा लागतो, जेथे गंजण्याचा धोका लक्षात घेता विमा शुल्कदेखील जास्त असते. या सर्व कारणांमुळे शिपिंग शुल्क वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये भारतातून डिझेल कोणत्याही ईयू देशापर्यंत पोहोचले नाही.आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये डिझेलची फक्त 1 शिपमेंट ब्रिटनमध्ये पोहोचली. ईयू मध्ये त्याचा पुरवठा नव्हता. तथापि, अलीकडेच भारतातून मार्लिन सिसिली आणि मार्लिन ला प्लाटा नावाच्या दोन जहाजांमध्ये बॅरल लोड करण्यात आले आहेत, जे या महिन्याच्या अखेरीस रॉटरडॅम, नेदरलँड्स येथे पोहोचतील. दुसरीकडे, फेब्रुवारीमध्ये भारतातून आशियाई देशांमध्ये डिझेल मालवाहतूक करणाऱ्यांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. यातील काही माल बांगलादेश आणि सौदी अरेबियातही पोहोचला. पीस व्हिक्टोरिया आणि ऑरेंज व्हिक्टोरिया यांसारख्या जहाजांवर भरलेला माल पूर्व आशियामध्ये पोहोचवला जात आहे.

भारताचा 80 टक्के व्यापार सागरी मार्गाने

12 टक्के ते 30 टक्के जागतिक व्यापार आणि कंटेनर वाहतूक लाल समुद्रातील सुएझ कालव्यातून दरवर्षी केली जाते. हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे युरोप आणि आशियामधील मुख्य मार्गावरील आंतरराष्ट्रीय व्यापार अडचणीत आला आहे. भारताचा 80 टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. त्याच वेळी, 90 टक्के इंधनदेखील सागरी मार्गाने येते. सागरी मार्गावरील हल्ल्यांचा थेट परिणाम भारताच्या व्यवसायावर होतो. त्यामुळे पुरवठा साखळी बिघडण्याचा धोका आहे. हौथींचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनही त्यांच्यावर कारवाई करत आहेत. दोन्ही देशांनी मिळून येमेनमधील हौथींच्या ठाण्यांवर आतापर्यंत तीन वेळा हल्ले केले आहेत. अमेरिकेने सुमारे 10 देशांसोबत एक युतीदेखील केली आहे, जी लाल समुद्रातील हौथींना रोखण्यासाठी आणि मालवाहू जहाजांना हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी काम करत आहे.

Advertisement
Tags :

.