Shaktipeeth highway | शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले ? शक्तीपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, करवीरमधील १७ गावांचा समावेश
कोल्हापूरात शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग जाहीर
कोल्हापूर: विदर्भातून गोव्यालाजाणारा बहुचर्चित 'शक्तीपीठ महामार्ग गेली काही वर्षे जमीनबाधित शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे रखडला आहे. शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने या मार्गाचे रेखांकन बदलण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग होणारच, हे आता जवळजवळ निश्चित झाले असून पूर्वीच्या रेखांकनामध्ये दक्षिण करवीर आणि कागलमधून जात असलेल्या या महामार्गाला जोरदार विरोध झाल्यामुळे आता हा मार्ग हातकणंगले, पन्हाळा, करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा, चंदगडमधून जाणार असून यात जिल्हयातील ७३ गावांमधील करवीर तालुक्यातील सर्वाधिक १७गावांचा समावेश आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मार्ग जिल्ह्यातून जाणार नसल्याची हमी दिली होती. हातकणंगले, शिरोळ,करवीर दक्षिण आणि कागलमध्ये सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील शक्तीपीठ महामार्गात बागायत शेती बाधित झाल्याने शेतकरी व लोकप्रतिनिधींनी तीव्र लढा दिला. अखेर शासनाने 'शक्तीपीठ चे रेखांकन बदलले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यालाही 'शक्तीपीठ'चा लाभ होणार आहे. यात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या भागातील गावे महामार्गापासून दूर असलेली गावे शक्तीपीठ महामार्गामुळे हायवेवर येणार आहेत.
सांगली जिल्ह्यातून पन्हाळा तालुक्यात येणारा हा मार्ग करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, हसूरमार्गे राधानगरी तालुक्यात प्रवेश करणार आहे. राशिवडे-ळवडे परिसरातून भोगावती नदीवरून दूधगंगा काठाने हा महामार्ग भुदरगडमध्ये जाणार आहे.राधानगरीतून भुदरगडमध्ये जाताना भोगावती आणि दूधगंगा नदीवर मोठे पूलही बांधण्यात येणार आहेत राधानगरी तालुक्यातील राशिवडे, येळवडे, ठिकपुर्ली, बारडवाडी,तळाशी, कपिलेश्वर, तुरंबे, मालवे या गावातून हा शक्तीपीठ मार्ग पुढे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरातील बहुतांश बागायती जमीन या मार्गात जाण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
शासनाने या मार्गाला नव्याने मंजुरी दिल्यापासून हा मार्ग कोणत्या गावातून जाणार याची प्रतीक्षा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी व गावांना लागून राहिली होती. अखेर याचा अधिकृत गुगल नकाता समोर आला आहे. प्रसिद्ध झालेल्या गुगल नकाशावरून प्रत्यक्षात गावांची नावे लक्षात आली असली, तरी काही गावांच्या हद्दीतून हा मार्ग जाणार असल्याने गावांची संख्या कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्यातील ७५ गावांसह सांगली जिल्हयातील २५, सिंधुदुर्ग जिल्ख्यातील ११, सातारा मधील १६ तर सोलापूर मधील ३३ गावांतून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे.
अशी आहेत जिल्हयातील तालुका निहाय ७३ गावे
हातकणंगले तालुका:जुने पारगाव, नवे पारगाव.
पन्हाळा तालुका: वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे.
करवीर तालुका: केर्ली-केर्ले (रत्नागिरी-नागपूर हायवे क्रॉस), पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपिरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला.
राधानगरी तालुका: राशिवडे बु., चंद्रे, येळवडे, कोलवडे, वाघावडे, मोहाडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे.
कागल तालुका:बोरवडे, उंदरवाडी.
भुदरगड तालुका नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, महूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली.
आजरा तालुका: हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, मसोली, देऊळवाडी.
चंदगड तालुका: बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बु., कानूर खु., पिळणी, झांबरे धरण, इसापूर.