ममतादीदींकडे मागितली नाही भीक
अधीर चौधरी संतप्त : बंगालमध्ये काँग्रेसला 2 जागा सोडण्याचा प्रस्ताव
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
इंडिया गटात जागावाटपावरून सहमती होत नसल्याचे चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी थेट तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनाच लक्ष्य केले आहे. ममता बॅनर्जी याच आघाडी इच्छित नाहीत. त्या मोदींच्या सेवेत मग्न असल्याची टीका चौधरी यांनी केली आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आघाडीतील सहकारी काँग्रेसला केवळ दोन लोकसभा मतदारसंघ देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 2019 च्या निवडणुकीत तृणमूलने राज्यात 43 टक्के मते प्राप्त करत 22 जागा जिंकल्या होत्या. अशा स्थितीत बंगालमधील आम्ही प्रमुख पक्ष असून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला मिळावा अशी तृणमूल काँग्रेसची भूमिका आहे. तृणमूलच्या या फॉर्म्युल्यावर काँग्रेसने गुरुवारी तीव्र आक्षेप दर्शविला. ममता बॅनर्जी यांच्याकडे कुणी भीक मागितली नाही. ममता या स्वत:च आघाडी इच्छित असल्याचे सांगत आहेत, परंतु आम्हाला ममतादीदींच्या दयेची कुठलीच गरज नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असे अधीर रंजन चौधरींनी म्हटले आहे.
तृणमूलला पराभूत करू
काँग्रेस स्वत:च्या तयारीसह वाटचाल करत आहे. आम्ही मुर्शिदाबादमध्ये तृणमूल आणि भाजपला अनेकवेळा पराभूत केले असून पुन्हा पराभूत करू असे अधीर चौधरी यांनी म्हटले आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला
जागावाटप हे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर करण्याचा तृणमूलचा मानस आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील सर्व 42 जागा लढविल्या होत्या आणि मालदा दक्षिण आणि बरहामपूर मतदारसंघात विजय मिळविला होता. सर्वात जुन्या पक्षाला केवळ 5.67 टक्के मते मिळाली होती. तर माकपला 6.33 टक्के मते मिळाली होती.