डिचोली पोलिसांनी आवळल्या ‘हिस्टरी शीटर’च्या मुसक्या
मुंबई विमानतळावर केली अटक: गोव्यातील अनेक गुन्ह्यांत सहभाग,अनेक वर्षांपासून होता फरार
डिचोली : डिचोली तसेच इतरही पोलिसांना विविध प्रकरणांमध्ये हवा असलेला हिस्टरी शीटर साखळी येथील सतीश गावस याला डिचोली पोलिसांनी मुंबई येथील विमानतळावर शिताफीने अटक केली. सतीश गावस हा गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता. सध्या त्याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. आज सोमवारी त्याला डिचोलीतील प्रथम श्रेणी न्यायालयात सादर केले जाणार आहे. सतीश गावस याच्यावर 9 गुन्हेगारी प्रकरणे तसेच अनेक 138 कलमांखालील गुन्हे आहेत. एनआयए कायद्याअंतर्गतही त्याच्यावर गुन्हे आहेत. सतीश याच्या शोधात असलेल्या पोलिसांना तो युएई येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याची माहिती मिळवत तो मुंबईतील विमानतळावर उतरला असता डिचोली पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. गेली दोन वर्षे सतीश हा फरार असल्याने त्याच्याविरोधातील अनेक वॉरंट प्रलंबित राहिले होते. या प्रकरणी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल तसेच डिचोलीचे उपअधीक्षक सागर एकोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिनेश गडेकर, उपनिरीक्षक अमरनाथ पाळणी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सतीश गावस याला अटक करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली.