धूत ट्रान्समिशनचा आयपीओ 38 टक्के प्रिमीयमसह सुचीबद्ध
मुंबई : धूत ट्रान्समिशनचा समभाग सोमवारी शेअरबाजारात 38 टक्के प्रिमीयमसह सुचीबद्ध झाला आहे. या आयपीओला गुंतवणूकीत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रत्येक लॉटवर जवळपास 5600 रुपयांचा नफा गुंतवणूकदारांना प्राप्त करता आला आहे.
बाजारात कमकुवतता असतानाही धूत ट्रान्समिशनचा समभाग दमदारपणे लिस्ट झाला. इशु किमत 871 रुपयांच्या तुलनेत समभाग एनएसईवर 38 टक्के वाढीसोबत 1200 रुपयांवर सुचीबद्ध झाला. याआधी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला तेव्हा गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद नोंदवला होता. शेवटच्या दिवशी आयपीओ 74 पट भरला होता. प्रत्येक लॉटवर लिस्टींगनंतर जवळपास 5600 रुपयांचा नफा झाला आहे. 871 च्या तुलनेत 1200 च्या भावावर समभाग खुला झाला. याप्रमाणे पाहता प्रति समभाग 329 रुपयांचा नफा झाला होता. एका लॉटअंतर्गत गुंतवणूकदारांना 17 समभाग मिळाले होते.
आयपीओला प्रतिसाद
सदरच्या आयपीओअंतर्गत 1,60,80,445 ताजे समभाग जारी करण्यात आले होते, त्यातून 1400 कोटी रुपयांची उभारणी करण्यात आली. तर ऑफर फॉर सेलअंतर्गत प्रवर्तक व सध्याच्या गुंतवणूकदारांनी 1,91,37,602 समभागांची विक्री केली आहे. याअंतर्गत 1667 कोटी रुपये उभारले गेले. 10 ऑगस्टला आयपीओ खुला होऊन 12 ऑगस्टला बंद झाला होता.