For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धुरंदर नेता

06:41 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
धुरंदर नेता
Advertisement

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, भारतीय ऑलिंपिक महासंघाचे माजी अध्यक्ष आणि विविध संस्था, संघटनांचे जन्मदाते सुरेश कलमाडी यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारण व क्रीडाकारणातील एका धुरंदर नेतृत्वाचा व झपाटलेल्या पर्वाचाच अस्त झाला आहे. राज्याच्या व देशाच्या राजकारणात ‘सबसे बडा खिलाडी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या कलमाडींचे मूळ खरे तर कर्नाटकात. परंतु, पुण्यासारख्या मराठी शहरात व सांस्कृतिकनगरीत कलमाडींनी राजकीय श्रीगणेशा केला आणि अगदी दिल्लीपर्यंत धडक मारली, हा त्यांचा प्रवास थक्क करणारा ठरतो. एनडीएसारख्या नावाजलेल्या संस्थेतून पदवी घेऊन भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावलेल्या कलमाडींनी त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली, यामागे त्यांची निश्चित योजना असावी. 80 चे दशक हे महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय धामधुमीचे. याच काळात शरद पवारांचे नेतृत्व राज्यात प्रस्थापित झाले. कलमाडी आणि पवार यांचा स्नेहबंध जुळलाही तोही याच सुमारास. पवार यांनी कलमाडी यांचे नेतृत्वगुण ओळखले व पवारांच्याच सल्ल्यातून कलमाडी राजकारणात आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आणि आपला ठसा उमटवला. त्यामुळे लवकरच त्यांच्या खांद्यावर प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. अध्यक्षपदाची कारकीर्दही त्यांनी गाजवली. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत माणसे जोडण्याचे काम केले. 1978 मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा प्रयोगही त्यांनी केला. तो अयशस्वी ठरला, तरी कलमाडींचे व्यक्तिमत्त्व हातपाय गाळणाऱ्यातले नव्हते. पक्षकार्य सुरूच ठेवत पुणे, महाराष्ट्र, दिल्ली अशी आपली कनेक्टिव्हिटी त्यांनी विस्तारत नेली. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि कलमाडी हे दोघेही पूर्वाश्रमीचे वैमानिक. त्यामुळे त्यांच्या तारा पटकन जुळल्या. 1982  ला राज्यसभेवर निवडून आलेल्या कलमाडींना तब्बल चार वेळा संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात संधी मिळाली. यातूनच दिल्ली दरबारातील त्यांचे वजन अधोरेखित होते. आपल्या नेतृत्वाच्या कक्षा वाढवण्यासाठी देशातील पहिली आंतरराष्ट्रीय पुणे मॅरेथॉन त्यांनी सुरू केलीच, शिवाय राजीव गांधी यांना त्यामध्ये धावायला लावले. त्यामुळे संपूर्ण देशभर या इव्हेंटची चर्चा झाली. तिथून कलमाडी जे ग्लॅमरमध्ये आले, ते अगदी 2010 पर्यंत. पुण्याचे राजकारण तसे वळणावळणाचे. काकासाहेब गाडगीळ, एस. एम. जोशी, मोहन धारिया, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, अण्णा जोशी यांसारख्या अनेक राजकारण्यांनी पुण्याचे नेतृत्व केले. त्याच पुण्याने कलमाडी यांच्यासारख्या अमराठी माणसाचे नेतृत्व स्वीकारले, यामागे कलमाडींचे कौशल्य होते. 1991 मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी कलमाडी यांनी दिल्लीत खासदारांना मेजवानी कशी दिली, याच्याही बऱ्याच दंतकथा आहेत. अर्थात नरसिंहराव यांनी बाजी मारल्याने त्यांचे प्रयत्न फसले असले, तरी राव यांना हा माणूस काय आहे, हे कळून चुकले आणि त्यानंतर काही काळासाठी का होईना कलमाडी यांना रेल्वे राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. या अल्प कारकिर्दीत कलमाडी यांना राव यांनी बरेच निर्णयाधिकार दिले होते. त्याचा फायदा घेत त्यांनी बुलेट ट्रेन गतीने असे निर्णय घेतले, की अनेकांना तेच कॅबिनेट मंत्री आहेत, असे वाटे. कलमाडींच्या काळात अनेकविध रेल्वेगाड्या सुरू झाल्या, मुंबईचे सीएसटी असे नामकरण झाले. त्यामुळे त्यांचे नाव देशभर पोहोचू शकले. पुण्यात 90 च्या दशकात गाडगीळ आणि कलमाडी यांच्यात नेतृत्वाची तीव्र स्पर्धा होती. गाडगीळांचे सुसंस्कृत नेतृत्व विरुद्ध कलमाडी यांचे ग्लॅमरस राजकारण या स्पर्धेत अखेर कलमाडी यांनी बाजी मारली. त्यामुळे पक्षावर पकड मिळविलेल्या कलमाडी यांना 1996 मध्ये काँग्रेसला उमेदवारी द्यावी लागली. त्यानंतर काही काळ काँग्रेसशी फारकत घेत कलमाडी यांनी पुणे विकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण केले असले, तरी भाजप व इतर पक्षात जाणे त्यांनी टाळले. त्यामुळेच लगेचच स्वगृही परतणे त्यांना सोपे गेले आणि फलदायीही ठरले. त्यानंतर 2004, 2009 मध्ये त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली. पक्षानेही पुढे त्यांच्यावर अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या. संसदेच्या विविध समित्यांवरही त्यांनी प्रभावीपणे काम केले. खेळ हा कलमाडींचा सर्वाधिक आवडता विषय. भारतीय ऑलिंपिक महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले. 1996 पासून तब्बल 16 वर्षे त्यांनी काम पाहिले. एशियन अॅथलेटिक्स असोसिएशनचेही ते अध्यक्ष होते. 2008 ची युवा राष्ट्रकुल, 2010 राष्ट्रकुल स्पर्धा यांसह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करण्याकामी त्यांनी पुढाकार घेतला. बालेवाडी-म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीचे शिल्पकार हे कलमाडीच. नुसत्या स्पर्धा भरवून चालणार नाही, तर खेळाडूंना खेळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व कोचिंगची सोय उपलब्ध करून द्यावी लागेल, याची त्यांना जाण होती. त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलली. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्य घरांतील मुलांना संधी मिळाली. म्हणूनच मागच्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्रामध्ये भारतीयांनी केलेल्या कामगिरीचे श्रेय कलमाडींनाही जाते. पुण्यात विविध प्रकल्प वा गुंतवणुकीकरिता पुढाकार घेतानाच शहराला जागतिक नकाशावर आणण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. ब्रँडिंग व इव्हेंट मॅनजेमेंटमध्ये त्यांचा हातखंडा होता. पुणे फेस्टिव्हल, पुणे फिल्म फेस्टिव्हल यांसारखे महोत्सव त्यांनी केवळ सुरू केले नाहीत, तर ते लोकाभिमुख केले. कॉमनवेल्थ घोटाळ्यातून ते बाहेर आले, तरी त्यांच्या कारकिर्दीला डाग लागला, तो लागलाच. तरीही कलमाडींनी क्रीडा क्षेत्राच्या आणि पुण्याच्या विकासात दिलेले योगदान नाकारता येणार नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.