For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयसीसी क्रमवारीत चमकला ‘ध्रुव’ तारा

06:50 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयसीसी क्रमवारीत चमकला ‘ध्रुव’ तारा
Advertisement

कसोटी क्रमवारीत गगनभरारी, 69 व्या स्थानी झेप : यशस्वी जैस्वाल 13 व्या स्थानी : टॉप टेन मध्ये विराट एकमेव भारतीय

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात सोमवारी इंग्लंडवर पाच विकेट राखून विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. या विजयासह टीम इंडियाने आयसीसी कसोटी क्रमवारीतील आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. याशिवाय, फलंदाजी क्रमवारीत युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल व ध्रुव जुरेलने मोठी गगनभरारी घेतली आहे. अवघ्या आठ कसोटी सामन्यानंतर जैस्वालने टॉप 15 फलंदाजामध्ये स्थान पटकावले आहे. तर अवघ्या दोन कसोटीत ध्रुव जुरेल 69 व्या स्थानावर आला आहे.

Advertisement

आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ताज्या क्रमवारीत टॉप 5 फलंदाजांच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर विराजमान आहे. विल्यमसनच्या नावावर 893 गुण आहेत. तर 818 रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जो रुट 799 गुणांसह तिसऱ्या न्यूझीलंडचा डेरिल मिचेल 780 गुणांसह चौथ्या, पाकिस्तानचा बाबर आझम 768 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, टॉप 10 मध्ये विराट कोहली एकमेव भारतीय आहे. विराट सध्या नवव्या स्थानी असून रोहित शर्मा 13 व्या तर रिषभ पंत 14 व्या स्थानी आहे.

जैस्वालची यशस्वी प्रगती

युवा खेळाडू यशस्वी जैस्वालसाठी इंग्लंडविरुद्ध मालिका फायदेशीर ठरली. अवघे आठ कसोटी सामने खेळणाऱ्या जैस्वालने आयसीसी क्रमवारीत 13 व्या स्थानी झेप घेतली आहे. त्याचे हे कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेत तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या जैस्वालने चार कसोटी सामन्यात 94 च्या सरासरीने 655 धावा चोपल्या आहेत. यामध्ये दोन द्विशतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत. ब्रिटिशाविरुद्ध मालिकेतील या शानदार कामगिरीचा त्याला ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे. अर्थात, इंग्लंडविरुद्ध एक सामना बाकी असून या सामन्यात दमदार कामगिरी करत टॉप 10 मध्ये येण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

दोन कसोटी खेळणारा जुरेल कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी

ध्रुव जुरेलच्या पहिल्या कसोटीनंतर जेव्हा आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली होती, तेव्हा त्याला पहिल्या 100 फलंदाजांमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. पण आता तो थेट 69 व्या क्रमांकावर आला आहे. त्याने 31 स्थानांची झेप घेतली आहे. त्याचे सध्या 461 गुण आहेत. विशेष म्हणजे, केवळ दोन कसोटी खेळल्यानंतर त्याने वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर, काइल मेयर्स, दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सेन यासारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे.

सरफराज टॉप 100 मधून बाहेर

यापूर्वी याच मालिकेतून भारताकडून पदार्पण करणारा सरफराज खाननेही आयसीसी कसोटी क्रमवारीत दमदार एंट्री केली होती. पण रांची कसोटीत तो जास्त धावा करू शकला नाही आणि गोल्डन डकचा बळी ठरला, त्यामुळे आता तो टॉप 100 फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे.

गोलंदाजीत बुमराह अव्वल

गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल तर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर रवींद्र जडेजा सहाव्या स्थानावर आहे. याशिवाय, दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी 22 व्या स्थानावर असून सिराजने देखील 21 वे स्थान पटकावले आहे.

तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल आणि रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर अक्षर पटेलला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर घसरला आहे.

Advertisement
Tags :

.