धोनीचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश
अन्य सहा खेळाडूंनाही स्थान
वृत्तसंस्था / लंडन
जागतिक क्रिकेट क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या क्रिकेटपटूंचा समावेश आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये करुन त्यांना गौरविण्यात येते. भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनीच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदानाबद्दल आयसीसीने त्याचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करुन गौरविले आहे.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये एम. एस. धोनीसह अन्य पाच पुरुष क्रिकेटपटू तसेच दोन महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आल्याचे आयसीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज मॅथ्यू हेडन, द. आफ्रिकेचे ग्रिम स्मिथ, हशीम आमला तसेच न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. महिलांच्या विभागात इंग्लंडची माजी यष्टीरक्षक आणि कर्णधार सारा टेलर तसेच पाकची माजी कर्णधार सना मीर यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करुन गौरविण्यात आले आहे.
भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनीने आपल्या वैयक्तिक कारकिर्दीत क्रिकेटच्या विविध प्रकारात अनेक विक्रम केले तसेच त्याने क्रिकेट क्षेत्रात आपले दीर्घकालिन अस्तित्व, सातत्य आणि तंदुरुस्ती राखल्याची वैशिष्ट्यो पहावयास मिळतात. जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये धोनी हा शांत प्रवृत्तीचा आणि मैदानावर कोणत्याही कठीण परिस्थितीत थंड डोक्याने निर्णय घेत असल्याने त्याने कर्णधार या नात्याने आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. जागतिक क्रिकेटमध्ये धोनी हा एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून ओळखला गेला तसेच त्याने अनेकवेळा फिनिशरची भूमिका घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
एम. एस. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विविध प्रकारातील 538 सामन्यांत 17266 धावा जमविल्या असून त्याने यष्टीमागे 829 बळी मिळविले आहेत. 2007 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व धोनीने केले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 साली भारतीय संघाने आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तसेच 2013 साली चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. धोनीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. धोनीने 60 कसोटीमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 27 कसोटी जिंकल्या, 18 कसोटी अनिर्णीत राखल्या तर 15 कसोटी गमविल्या. धोनीने वनडे प्रकारात 200 सामन्यांत भारताचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 110 वनडे सामने जिंकले असून 74 सामने गमविले आहेत. तसेच पाच सामने टाय राहिले आणि 11 सामने पावसामुळे वाया गेले.
धोनीने वनडे क्रिकेट प्रकारात यष्टीरक्षणात नवा विक्रम करताना यष्टीमागे 123 जणांना यष्टीचित केले आहे. तसेच त्याने यष्टीरक्षक या नात्याने वैयक्तिक नाबाद 183 धावांची खेळी केली आहे. धोनीने 200 सामन्यात भारताचे नेतृत्व केले असून हा एक नवा विक्रम आहे. 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर म्हणजेच 2011 साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.
क्रिकेटच्या टी-20 प्रकारात धोनीने विक्रम नोंदविला आहे. त्याने 72 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 41 सामने जिंकले असून 28 सामने गमविले तर 1 सामना टाय राहिला व दोन सामने पावसामुळे वाया गेले. धोनीने वनडे क्रिकेटमध्ये 350 सामन्यांत 50.57 धावांच्या सरासरीने 10 शतके आणि 73 अर्धशतकांसह 10773 धावा जमविल्या. धोनीने 90 कसोटीमध्ये 6 शतके आणि 33 अर्धशतकांसह 4876 धावा तसेच त्याने टी-20 प्रकारात 98 सामन्यांत दोन अर्धशतकांसह 1617 धावा नोंदविल्या आहेत. मैदानावर फलंदाजाला यष्टीचीत आणि धावचीत करण्याचे वैशिष्ट्या त्याच्या यष्टीरक्षणामध्ये आजही पहावयास मिळते. जागतिक क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी हा कुशल, तरबेज आणि शांतप्रवृत्तीचा कर्णधार म्हणून ओळखला जातो.