Kolhapur: केडीसीसीची धवलक्रांती योजना ; दुधाळ म्हैस खरेदीसाठी मिळणार कर्ज
भूमीहीन शेतमजुरांनाही मिळणार तीन लाखांचे आर्थिक भांडवल
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पर राज्यातील दुधाळ म्हशींच्या खरेदीकरता धवलक्रांती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजुरानाही आर्थिक भांडवल मिळणार आहे. विशेष म्हणजे निव्वळ दूध संस्थांच्या आणि दूध संघाच्या हमीवर हा अर्थ पुरवठा होणार आहे. याबाबतचा निर्णय बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला होता आहे. निव्वळ घरठाण उताऱ्यावर हे कर्ज उपलब्ध होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील अल्पभूधारक व भूमीहीन शेतमजुरांना पर राज्यातील जातिवंत म्हैस खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या माध्यमातून १२ टक्के व्याज परतावा व व्याज अनुदान कर्ज योजनेअंतर्गत म्हशी खरेदी करण्याकरता योजना सुरूच आहे.
या योजनेअंतर्गत गोकुळ दूध संघ व तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या हमीपत्रावर पर राज्यातील म्हशी खरेदीसाठी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण मंजूर करण्यात आले होते.
दरम्यान; महामंडळाकडून व्याज परताव्यासाठी पात्रता प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ होत असल्यामुळे व विलंबाने मिळणारा व्याज परतावा यामुळे कर्जदारांना तात्काळ कर्ज मिळण्याकरता या धोरणाव्यतिरिक पर राज्यातील जातिवंत म्हशी खरेदी करण्यासाठी कर्ज मागणी होत होती. त्यानुसार; संचालक मंडळाच्या दि. २९ सप्टेंबर २०२५ च्या बैठकीत दोन म्हैस खरेदी करण्याकरता "धवलक्रांती मध्यम मुदत कर्ज योजना" धोरण मंजूर केले आहे.
असे आहे धोरण......!
□ कर्जफेड मुदत तीन ते पाच वर्ष.
□ एका म्हशीसाठी दीड लाखाप्रमाणे दोन म्हशींसाठी मिळणार तीन लाख कर्ज.
□ शेतकरी दूध पुरवठा करीत असलेल्या दूध संस्था व दूध संघाची लागणार हमी.
□ फक्त घरठाण उताऱ्यावर मिळणार अर्थ पुरवठा.
□ बँकेकडून लाभार्थ्यास दिले जाणार रू. १० हजार अनुदान