धारवाड जिल्हा श्रीराम सेना अध्यक्षांना सौंदत्ती डोंगरावर पोलिसांकडून मारहाण
परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल : श्रीराम सेना बनली आक्रमक
बेळगाव : देवीच्या दर्शनासाठी सौंदत्ती डोंगरावर गेलेल्या श्रीराम सेनेच्या धारवाड जिल्हा अध्यक्षाला पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. वादावादीनंतर मारहाण झाली असून सौंदत्ती पोलीस स्थानकात परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत. हुबळी येथील आण्णाप्पा दिवटगी (वय 30) हे मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सौंदत्ती सरकारी इस्पितळात उपचार करण्यात आले. गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले असता ही घटना घडली. सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक धर्माकर धर्मट्टी पुढील तपास करीत आहेत.
जखमी आण्णाप्पा यांची पत्नी सुषमा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एक पोलीस व एक होमगार्डवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस देमनगौडा नागनगौडर (वय 31) यांनीही आण्णाप्पा यांच्यावर फिर्याद दिली आहे. श्रीराम सेनेचे गंगाधर कुलकर्णी यांनी या घटनेचा निषेध केला असून हिंदू धार्मिक स्थळांवर दादागिरी बंद करा, असे सांगत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. गुरुवारी आण्णाप्पा हे आपल्या कुटुंबीयांसह देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी होमगार्डबरोबर झालेल्या भांडणानंतर त्याने पोलिसांना बोलावून घेऊन आण्णाप्पावर हल्ला केला. पोलिसांचे म्हणणे वेगळे आहे. दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या गेटमधून ते दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न करीत होते, असे सांगितले. या घटनेनंतर श्रीराम सेना आक्रमक बनली आहे.