Dharmendra Deol : धर्मेंद्र यांची स्वामी समर्थ दर्शनाची इच्छा अधुरी; अक्कलकोट यात्रा स्वप्न राहिले अपूर्ण
धर्मेंद्र यांना अक्कलकोटला येण्याची होती इच्छा
सोलापूर : बॉलीवूडचे प्रख्यात अभिनेता धर्मेंद्र हे अक्कलकोट येथे स्वामीसमर्थांच्या दर्शनासाठी येणार होते, मात्र सोमवारी त्यांच्या निधनाने त्यांच्या श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाची इच्छा अधुरी राहिली आहे.
एकेकाळी बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे धर्मेंद्र शोले यासह त्यांचे अनेक चित्रपट गाजले. 'ही-मॅन' म्हणून ते प्रसिद्ध होते. सोलापुरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. धर्मेंद्र आजवर सोलापुरात कधी येऊन गेल्याची माहिती नाही, मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला येण्याची इच्छा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. डॉ. अजय दासरी यांच्याकडे प्रदर्शित केली होती.
दासरी यांनी काही महिन्यांपूर्वी धर्मेंद्र यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दासरी यांनी धर्मेंद्र यांना अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजय भोसले यांनी पाठविलेले शाल व स्वामीसमर्थांचा फोटो भेट दिला होता. याप्रसंगी धर्मेंद्र यांनी दासरी यांना आपण लवकरच अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेणार, असे सांगितले होते. सोमवारी त्यांच्या निधनाने धर्मेंद्र यांची स्वामीसमर्थांचे दर्शन घेण्याची इच्छा अधुरी राहिली आहे.
दरम्यान धर्मेंद्र यांनी या भेटीमध्ये दासरी हे नाट्य कलावंत व दिग्दर्शक असल्याचे चर्चेतून समजताच दासरी यांची 'आप थिएटर से आये हो क्या... असे म्हणत मोठ्या आस्थेने चौकशी केली होती.
महेश गादेकरांनी साकारलेल्या पेटिंगवर धर्मेंद्र यांनी दिली होती दाद
शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांची दोन अॅक्रेलिक कलरमध्ये पेंटिंग साकारली आहेत. ८ जानेवारी २०१५ रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी अभिनेता धर्मेंद्र यांना दोन्ही पेंटिंग दाखवली. त्यावेळी करत अप्रतिम अशी दाद दिली होती. महेश गादेकर हे मुळात कलाकार आहेत. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले आहे.
ते समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असले तरी चित्रकलेची आवड मात्र त्यांनी अजूनही जोपासली आहे. त्यांनी खासदार शरदचंद्र पवार, गुलजार यांच्यासह त्यांनी इतर अनेक पेंटिंग्ज साकारली आहेत. दरम्यान धर्मेंद्र यांच्या निधनानंतर महेश गादेकर यांनी सांगितले सिंगल पोट्रेट धर्मेंद्र यांना खूप आवडले. ते पोर्ट्रेट त्यांनी फार्म हाऊसमध्ये लावण्यासाठी मागितले. परंतु मी आठवण म्हणून माझ्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला.