Dharmendra Deol : कोल्हापूरशी धर्मेंद्र यांचे जिव्हाळ्याचे नाते; लोणावळा अन् तांबडा-पांढरा रस्स्याच्या गोड आठवणी
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या आठवणी उजाळ्यात
by विद्याधर पिंपळे
कोल्हापूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण देश भावूक झाला आहे. त्यांच्या कोल्हापूरशी जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी आता पुनः जाग्या होत आहेत. कोल्हापूरचे उद्योजक आणि अर्थमुव्हींग व्यावसायिक अभय देशपांडे यांनी त्यांच्या वैयक्तिक भेटींतील अनुभव शेअर त्या दिवसांची आठवण ताजी केली.
धर्मेंद्र यांची लोणावळा येथे मोठी शेती असून त्या शेतीत असलेल्या तळ्याच्या कामाची जबाबदारी अभय देशपांडे यांच्याकडे होती. तळ्यातील दगडाचे क्रशिंग कोण करणार, याची तपशीलवार चौकशी धर्मेंद्र यांनी स्वतः केली. हे काम कोल्हापुरातूनच व्हावे, याची त्यांनी खात्री करून घेतली. एवढ्या मोठ्या कलाकाराचा जमिनीवरचा व्यवहार पाहून देशपांडे आश्चर्यचकित झाले होते. दर जास्त आहे, असे स्पष्ट सांगत धर्मेंद्र यांनी व्यवसायातील अनुभवही पहिल्या भेटीतच छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग दाखवून दिला. तरीही त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वासाठी काम करण्याची संधी हेच मोठे होते, असे अभय देशपांडे यांनी सांगितले.
दुसऱ्या भेटीत झालेल्या पार्टीत धर्मेंद्र यांनी कोल्हापूरच्या जेवणाच्या आणि येथील माणुसकीच्या अनमोल आठवणी जागवल्या. शोलेच्या शूटिंगदरम्यान बेंगळूरला जाताना ते 'ओपल हॉटेल'मध्ये थांबून तांबडा पांढरा रस्सा याचा आस्वाद घेत पुढे जात असत, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूरशी जुळलेले हे नाते २०१३ मध्ये अधिक घट्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेला धर्मेंद्र यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यावेळी प्रा. बाबासाहेब उलपे, राजेंद्र रायकर, प्राचार्य महादेव नरके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.