धर्मवीर संभाजी महाराज जयंती शिवप्रतिष्ठानतर्फे साजरी
आज 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा : सायंकाळी 4 वाजता देवदर्शन यात्रेसह भव्य मिरवणुकीचे आयोजन
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध द्वादशी (रविवारी) साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथील शंभूतीर्थ येथे संभाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोमवार दि. 9 जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वाजता देवदर्शन यात्रा काढण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. पूजेचे पौरोहित्य प्रथमेश हुरकडली यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख परशराम कोकितकर, विभागप्रमुख किरण बडवाण्णाचे, प्रमोद चौगुले, शिवाजी मंडोळकर, गजानन पवार, गजानन निलजकर, अमोल केसरकर यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार सोमवार दि. 9 रोजी साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरपर्यंत देवदर्शन यात्रा काढली जाणार आहे. सायंकाळी 4 वाजता देवदर्शन यात्रेला सुरुवात होईल. यामध्ये अश्वपथक, ध्वजपथक, वारकरी दिंड्या, पालखी, अब्दागिरी पथक, शस्त्रपथक, शिव छत्रपतींची मूर्ती, रणरागिणी महिला पथक व धारकऱ्यांचे पथक सहभागी होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.