धारगळ ग्रामसभा ठरावाला केराची टोपली
अखेर सनबर्नला 5 विरुद्ध 4 मतांनी परवानगी : आमदार, पंचांसह ग्रामस्थांच्या तुडविल्या भावना, विरोधी गटातील चार पंच आपल्या मतावर ठाम
पेडणे : धारगळ येथील नियोजित सनबर्न महोत्सवासाठी परवानगी देणारा ठराव धारगळ पंचायत मंडळाच्या काल सोमवारी झालेल्या बैठकीत 5 विऊद्ध 4 मतानी मंजूर झाल्यामुळे नागरिक संतप्त बनले आहेत. ज्या चार पंच सदस्यांनी विरोध केला त्यांनी सनबर्न संदर्भात जो निर्णय घ्यायचा असेल तो खास ग्रामसभा बोलावून घ्यावा अशी जोरदार मागणी केली. ग्रामसभेतील लोकांना सनबर्न हवा असेल तर आमची हरकत नसेल, असे मत माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य भूषण नाईक, माजी सरपंच अनिकेत साळगावकर, पंच सदस्य अमिता हरमलकर यांनी मांडले.
धारगळ पंचायतीची बैठक सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. नियोजित सनबर्न महोत्सवाच्या विरोधात रविवारी 1 रोजी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी विरोध केला होता. सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी त्या सभेत आपली हजेरी लावून आमदार प्रवीण आर्लेकर यांचे अभिनंदन केले होते, आणि स्वत: कडाडून विरोध केला होता. दुसऱ्या बाजूने सनबर्नच्या समर्थनार्थ काही लोक जमले होते, त्यात काही स्थानिक नागरिक आणि सरपंच, उपसरपंच, पंच सदस्यांनी पाठिंबा देण्यासाठी त्या सभेला उपस्थिती लावली होती.
चार पंचांचा प्रखर विरोध
काल सोमवारी 2 डिसेंबर रोजी धारगळ पंचायत मंडळाची खास बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सनबर्नला परवानगी देण्यावर चर्चा झाली. सत्तारूढ गटातील 5 पंच सदस्यांनी सनबर्नला परवानगी देण्याचा ठराव मांडला, तर 4 विरोधी पंच सदस्यांनी त्याला विरोध केला. त्यांचा विरोध असल्यामुळे यावर खास ग्रामसभा बोलावून निर्णय घेण्यात यावा, असा आग्रह धरला.
सनबर्न उधळून लावणार : नाईक
जो ठराव मंजूर केला तो आम्हाला अमान्य असून आम्ही आमदारांसोबत ज्या दिवशी सनबर्न होणार त्याच दिवशी आम्ही त्या ठिकाणी घुसून सनबर्न उधळून लावणार, असा पुनऊच्चार माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, अनिकेत साळगावकर या पंच सदस्यांनी पत्रकारांकडे बोलताना केला.
सनबर्न लोकांना हवाय : सरपंच
सरपंच सतिश धुमाळ यांनी माहिती देताना सांगितले की, सनबर्न लोकांना हवा आहे, म्हणूनच त्याच्या समर्थनार्थ सभा घेतली होती. त्या सभेला स्थानिक लोकांची उपस्थिती होती. आम्ही सत्तारूढ गट त्या सभेला उपस्थित होतो. आम्ही ठराव मंजूर करून सनबर्नसाठी परवानगी दिलेली आहे.
पंचायतीला, गावाला फायदा होणार
सनबर्नला परवानगी देण्यासाठी तुमच्यावर कुणी दबाव आणला आहे का? असा प्रश्न केला असता त्या प्रश्नाला उत्तर देताना सरपंच सतिश धुमाळ यांनी सांगितले की, आमच्यावर कसल्याच प्रकारचा कुणाचाही दबाव नाही. आम्ही सरकारच्या नियमानुसार या महोत्सवाला परवानगी दिलेली आहे. स्थानिकांना रोजगार मिळतील, स्टॉल धारकांना त्या ठिकाणी स्टॉल घालण्यासाठी स्टॉल मिळतील. टॅक्सी चालक, मोटरसायकल व्यावसायिकांना व्यवसाय उपलब्ध होणार असून शिवाय पंचायतीला कायद्यानुसार महसूल प्राप्त होणार आहे. पंचायतीला, गावाला फायदा आहे, त्यामुळे आम्ही त्याला परवानगी दिल्याचे सरपंच धुमाळ यांनी सांगितले.
पंचायतीला कचऱ्यासाठी वाहन मिळणार
पंचायतीला वाहन मिळणार म्हणून परवानगी दिली आहे का? असा सवाल पत्रकारांनी केला असता सरपंच धुमाळ यांनी सांगितले की, कंपनी पंचायतीला कचरा वाहन उपलब्ध करून देणार आहे. तशा प्रकारची बोलणी झालेली आहे. त्या कंपनीने पंचायत मंडळाला ग्वाही दिल्यामुळे आम्ही परवानगी दिल्याचे ते म्हणाले.
पंचायत मंडळाविरोधात लोकांचा रोष
यावेळी उपस्थित नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्तारूढ पंचायत मंडळ विकले गेले आहे, त्यांना पाकिटे मिळाली असतील म्हणून ते सरकारच्या बाजूने आणि सनबर्नच्या बाजूने राहिले, असा दावा यावेळी उपस्थित नागरिकांनी केला. मात्र आम्ही शेवटपर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा सनबर्न विरोधकांनी दिला.
संस्कृती बिघडवणारे कार्यक्रम नको
ज्येष्ठ नागरिक रोहिदास हरमलकर यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सनबर्न ही आमची संस्कृती नव्हे. देव, देवता मोठ्या प्रमाणात पेडणे तालुक्यात आहेत. सर्व देवतांचा आशीर्वाद पेडणेवासीयावर असल्यामुळे संस्कृतीचे जतन करणारे कार्यक्रम हवे आहेत. संस्कृतीची विल्हेवाट लावणारे कार्यक्रम आम्हाला नको. आम्ही अशा कार्यक्रमांना थारा देणार नाही.
सनबर्नच्या समर्थनार्थ
- सरपंच सतिश धुमाळ
- उपसरपंच दीप्ती नारोजी
- अर्जुन कानोळकर
- दाजी शिरोडकर
- दिलीप वीर
सनबर्नच्या विरोधात
- पंच भूषण नाईक
- अनिकेत साळगावकर
- अमिता हरमलकर
- प्रीती कानोळकर
वेळप्रसंगी सनबर्नच्याविरोधात न्यायालयात जाणार
पंचायत मंडळाच्या बैठकीत उपस्थित असलेले आणि सनबर्नला विरोध करणारे माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, माजी सरपंच तथा विद्यमान पंच अनिकेत साळगावकर यांनी स्पष्ट केले की, पंचायत मंडळाने घेतलेला ठराव आपल्याला मान्य नाही. त्यामुळे आम्ही वेळप्रसंगी न्यायालयातही धाव घेणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. मागच्या ग्रामसभेमध्ये सनबर्नच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी सत्ताधारी गटानेही विरोध दर्शवला होता. मग त्या ठरावाचे काय झाले? असा सवाल पंच अनिकेत साळगावकर यांनी उपस्थित करून पुन्हा नव्याने ग्रामसभा खास बोलावून निर्णय घेण्यात यायला हवा. त्यामुळे सरपंचांनी लवकरात लवकर विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे अशी मागणी त्यांनी केली.