सर्व प्रकल्प आदानींनाच का ?...महाविकास आघाडीला आत्ता जाग आली काय ? राज ठाकरे यांचा सवाल
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला असून त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाने हा प्रकल्प आदानींना गेल्यावर त्याच्या निषेधार्थ मुंबईत भव्य मोर्चा काढला आणि सरकारवर याची टिका केली. ठाकरे गटाच्या या टिकेला सत्ताधारी भाजप सरकारकडूनही जोरदार टिका करण्यात येऊन प्रत्युत्तर देण्यात आले. आता धारावी प्रकल्पाच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या वादामध्ये राज ठाकरे यांनीही उडी घेतली असून शिंदे- फडणवीस सरकारसह महाविकास आघाडीवरही तोंडसूख घेतले आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर प्रश्न उपस्थित केला. तसेच हा प्रकल्प आदानी कंपनीलाच देण्यात येण्यावर आपला तीव्र आक्षेप नोंदवला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “ धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प मुंबईत येत आहे. पण त्यापेक्षा तो परस्पर अदाणींनाच का दिला गेला ? असा प्रश्न निर्माण होत आहे. उद्योगपती गौतम अदाणी यांच्याकडे असं काय आहे ज्यामुळे विमानतळ, कोळसा यासारख्या सर्व गोष्टी फक्त तेच हाताळू शकतात ? देशामध्ये टाटांसारख्या इतरही अनेक मोठ्या कंपन्या आहेत. एवढा मोठा प्रकल्प मंजूर करण्यापुर्वी सरकारने त्यांच्याकडून डिझाईन्स मागवायला हवे होते. तसेच टेंडर्स काढायला हवे होते. धारावीमध्ये नेमकं काय होणार आहे हे सगळ्यांना कळायला हवं होतं. पण तसं झालं नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाने सरकारविरोधात काढलेल्या मोर्चावरही राज ठाकरे यांनी टिका केली. ते म्हणाले, “माझा फक्त एवढाच प्रश्न आहे की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आत्ता जाग आली काय ? हा प्रकल्प जाहीर होऊन ८ ते १० महिने झाले. त्यानंतर त्यांनी आज का मोर्चा काढला ? महाविकास आघाडीची सेटलमेंट व्यवस्थित होत नाही म्हणून हा मोर्चा काढला काय ?” असा परखड सवाल राज ठाकरेंनी ठाकरे गटाला केला आहे.