For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धाराशिवच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; दोन दिवसांत दुष्काळाबाबत जीआर जारी करण्याची फडणवीसांची घोषणा

04:50 PM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
धाराशिवच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा  दोन दिवसांत दुष्काळाबाबत जीआर जारी करण्याची फडणवीसांची घोषणा
Advertisement

उमरगा  प्रतिनिधी, महादेव पाटील  : धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर बनली असून पिकांच्या नुकसानीने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) पुढील दोन दिवसांत काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील पाहणीदरम्यान सांगितले की, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणे ही कायदेशीर प्रक्रिया असली तरी शेतकऱ्यांना केवळ पंचनाम्यांच्या प्रक्रियेत अडकवून ठेवण्याचा सरकारचा हेतू नाही. परिस्थिती लक्षात घेऊन सरसकट मदतीचा विचार केला जात असून, खरीपाबरोबरच रब्बी पिकांच्या नुकसानीचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

धाराशिव जिल्ह्यातही पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. कोंड गावातील पीक कापणी प्रयोगात अर्ध्या गुंठ्यातून केवळ 40 ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन नोंदवले गेले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्यक्ष पीक नुकसानीची तीव्रता स्पष्ट होत आहे.

Advertisement

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा आणि येरमाळा परिसरालाही भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन करण्यात आले होते. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना पिण्याचे पाणी, चारा आणि शेतीच्या नुकसानीसंदर्भात उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. मदतीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. पुढील प्रशासकीय प्रक्रियेनंतर मदतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

धाराशिवच्या शेतकऱ्यांचे लक्ष आता शासन निर्णयाकडे लागले असून, जाहीर होणाऱ्या मदतीत जिल्ह्यातील प्रत्यक्ष नुकसान आणि स्थानिक परिस्थितीचा कितपत विचार केला जातो, याकडेही लक्ष आहे.

Advertisement
Tags :

.