धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा फैसला उद्या; 200 कोटींच्या पीकविमा भरपाईचा प्रश्न; 3.57 लाख शेतकऱ्यांना निकालाची प्रतीक्षा; आमदार ज्ञानराज चौगुले यांचा न्यायालयीन लढा
उमरगा, प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, ७२ तासांच्या सूचनेच्या अटीचा आधार घेत विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायालयीन लढा दिला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देण्याचे आदेश दिल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयीन कार्यवाहीत विमा कंपनीकडून न्यायालयात रक्कम जमा करण्याचे आदेशही झाले होते.
आता ‘ज्ञानराज चौगुले विरुद्ध बजाज अलायन्झ’ या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि अपेक्षित निर्णयाकडे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तब्बल ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या पीकविमा भरपाईचा प्रश्न या प्रकरणाशी संबंधित असल्याने ३० सप्टेंबरच्या न्यायालयीन निर्णयाकडे शेतकरी वर्गाचे लक्ष आहे.
पीकविमा भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या न्यायालयीन प्रक्रियेतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून काय निर्णय दिला जातो आणि शेतकऱ्यांच्या भरपाईबाबत पुढील प्रक्रिया काय ठरते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.