For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धनगर समाजाचा आरक्षणासाठी चक्काजाम! तावडे हॉटेल चौकात शेळ्या-मेंड्यांसह ठिय्या 

06:25 PM Sep 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
धनगर समाजाचा आरक्षणासाठी चक्काजाम  तावडे हॉटेल चौकात शेळ्या मेंड्यांसह ठिय्या 
Dhangar community protest for reservation Tawade Hotel Chowk
Advertisement
सुमारे दीड तास वाहतूक ठप्प : आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा निवडणुकीत ताकद दाखवू :  आमदार गोपीचंद पडळकर यांचा इशारा  
कोल्हापूर  प्रतिनिधी
धनगर समाजासाठी राज्य घटनेने दिलेल्या अनुसुचित जमाती आरक्षणाची तत्काळ अमलबजावणी करा, यासह अन्य मागणीसाठी सकल धनगर समाजाने तावडे हॉटेल चौकात सोमवारी चवकाजाम आंदोलन केले. यावेळी समाजाची मागणीबाबत त्वरीत निर्णय घ्या अन्यथा येत्या निवडणूकीत धनगर समाज राजकारण्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. चुकीच्या पध्दतीने दिलेली ‘धनगड’ प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करा. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
जिल्हयातील सकल धनगर समाजाच्यावतीने तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको करण्यात आले. शेळया-मेंढ्यांसह विविध गावचे धनगर समाज धनगरी ढोलसह मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. डोक्यावर पिवळी टोपी.. गळयात पिवळा स्कार्प आणि कपाळाला पिवळा भंडारा लावून आंदोलक या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. येळकोट येळकोट जय मल्हार.. अनुसुचित जमाती आरक्षणाची अमलबजावणी तत्काळ करा. एकच मिशन, एसटी आरक्षण, अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. सुमारे दीड तासाहून अधिक वेळ करण्यात ओल्या या रास्तारोकोमुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
  आमदार पडळकर म्हणाले, केवळ राज्यकर्त्यांच्या नाकारतेपणामुळेच गेल्या 75 वर्षाहून अधिककाळा धनगर समाजावर अन्याय झाला आहे. अनुसुचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यामुळेच समाज सामाजिक शैक्षणिक राजकीय दृष्ट्या मागास राहिला आहे. राज्यात धनगर समाजाची मोठी ताकद आहे. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात 25 हजारापासून एक लाख साठ हजारापेक्षा जास्त समाजाचे मतदार आहे. या समाजाने एकजूट दाखवली तर हे राज्यकर्ते गुडघे टेकतील.
मल्हार सेनेचे बबनराव रानगे म्हणाले, राज्य शासनाने जसे आदिवासींना तसे धनगर समाजाला अशी 22 योजनांची घोषणा केली होती. परंतु त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. केवळ वेळकाढूपणा करत हे राजकारणी मंडळी धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप ही त्यांनी केला. यावेळी योगिता घुले, राजू पुजारी, अमोल गावडे, नागेश पुजारी, डॉ संदीप हजारे, ललिता पुजारी यांनी तीव्र शब्दात समाजाला असणारी आरक्षणाची गरज स्पष्ट केली.
 यावेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके, रामचंद्र डांगे, बयाजी शेळके, कल्लाप्पा गावडे, संजय पटकारे, अशोक कोळेकर, राघु हजारे, मच्छद्रिं बनसोडे, राजेंद्र कोळेकर, राजेश तांबवे, मायाप्पा पुजारी, अभिजीत बते, विकास घागरे, संजय काळे, संपत रूपने, कृष्णा पुजारी, जगन्नाथ माने, अमर पुजारी, शशिकांत पुजारी, बंडोपंत बरगाले, नवनाथ गावडे, भीमराव पुजारी, लक्ष्मण पुजारी, नारायण मोठे-देसाई आदी, उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Tags :

.