Gokul साठी वेट अँड वॉच, माजी पालकमंत्र्यांनी मात्र.., MP महाडिक काय म्हणाले?
अध्यक्ष डोंगळे यांच्या भूमिकेनंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात
कोल्हापूर : सध्या गोकुळ दूध संस्थेत दररोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या घटनांना अनेक राजकीय, सहकाराचे धागेदोरे असेल तरी याच्या राजकारणाची मात्र जिल्ह्यात चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ठाम भूमिका घेवून राजीनामा देण्यास नकार दिल्याने पुन्हा एकदा गोकुळचे वातावरण तापणार का ? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
गोकुळमध्ये आज होणाऱ्या संचालक मंडळ बैठकीत अरुण डोंगळे उपस्थित राहून पदाचा राजीनामा देणार होते. परंतु आता त्यांनी राजीनामा देण्यास थेट नकार दिला आहे. दरम्यान, आता त्यांच्या या भूमिकेनंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा न देण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी स्पष्टे केले आहे.
दरम्यान, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना गोकुळच्या नवीन अध्यक्षपदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, 25 वर्षे गोकुळ दूधसंघ महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात होता. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तथाकथित मंडळींनी एकत्रित येवून आमच्या विरोधात पॅनल उभा केला.
एकत्र येवून निवडणूक लढवली आणि संघ त्यांच्या ताब्यात गेला. सध्या गोकुळमध्ये कसा कारभार सुरू आहे हे सगळ्यांना माहित आहे. राज्यात महायुतीचा सरकार असल्याने महायुतीचाच अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे.
पुढे ते म्हणाले, महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांनी एकत्रित गोकुळ चांगल्या पद्धतीने चालवलं. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर येथील माजी पालकमंत्र्यांनी शक्कल लढवत माजी मुख्यमंत्री यांची मदत घेऊन महाविकास आघाडीचं पॅनल तयार केलं.
त्यामुळे सहकारी संस्थेस राजकीय स्वरूप प्राप्त झाले. आता गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष व्हावा, ही सगळ्यांची भावना आहे. याविषयी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून ते जाहीरपणे सांगता येणार नाही. पूर्वी जे चित्र होतं ते सध्या नाही, त्यामुळे अरुण डोंगळे राजीनामा देणार नाहीत, असंही ते म्हणाले.
गोकुळमध्ये सध्या राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे. गोकुळ संघामागे काही अदृश्य शक्ती आहेत, ज्या दिसत नाहीत. गोकुळमुळे शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला निर्णय होईल. गोकुळ संदर्भात आम्ही सध्या वेट अँड वॉच भूमिकेत आहोत, असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे.