धनंजय महाडिकांनी लावली ५ कोटींची पैज ! कागल आणि चंदगड तालुक्याला दिली 'ही' ऑफर
कोल्हापूरात राजकिय तापमान वाढत असताना आता एका नव्या वादात भर पडली आहे. भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करताना ५ कोटींची पैज लावली असून कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघापैकी ज्या मतदार संघातून संजय मंडलिकांना लीड देईल त्या तालूक्याला ५ कोटींचा निधी दिला जाईल असे आवाहन केले.
कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रचारसभा सध्या वादळी चर्चेत आहेत. कालच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाराजांवर केलेल्या टिकेमुळे राज्यभरात चर्चेचा विषय बनला असतानाच आज कागलमधील प्रचारसभेच लक्ष वेधलं गेल आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी कोकणात सरपंचांना मतदान वाढवण्यासाठी चांगलाच दम भरल्याचं उदाहरण ताजे असताना कोल्हापूरात आता राज्यसभेचे खासदार धनंजय मंडलिक यांनी अनोखी पैज लावली आहे.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची कागल येथे प्रचारसभा संपन्न झाली. या सभेत जिल्ह्यातील महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यासपीठावरून बोलताना पैज लावली. ते म्हणाले, "कागल तालुक्यात हसन मुश्रीफ आणि स्वतः संजय मंडलिक आहेत. चंदगड तालुक्यातही चांगली परिस्थिती आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांना कोणत्या तालुक्यातून जास्त मताधिक्य मिळतंय पाहूया... मी सर्वांना आवाहन करतो की चंदगड तालुक्यापेक्षा कागलकरांनी जास्त लीड दिलं तर आम्ही ५ कोटी रुपयांचा अधिकचा निधी देऊ....चला तर मग... लागली शर्यत…यामध्ये मी आणि संजय मंडलिक आम्ही दोघेही असणार आहोत. यामध्ये मी अडीच कोटींचा निधी देणार आणि संजय मंडलिक अडीच कोटी देतील. या शर्यतीत आम्ही दोघे आहोत हे ध्यानात ठेवा...नाहीतर तुम्ही उद्या मला एकट्याला धराल." असे त्यांनी म्हटलं आहे.