नैराश्येतून बोलणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही; गोकुळमध्ये विरोधी आघाडीचा पराभव अटळ : खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाला आता धार येऊ लागली आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना खासदार धनंजय महाडिक यांनी, विरोधकांना पराभव समोर दिसत आहे. काहीही वक्तव्य करत असल्याने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जागा वाटपाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही खासदार महाडिक यांनी सांगितले.
गोकुळच्या निवडणुकीसाठी नेते पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. प्रत्येक ठरावधारकाची उमेदवारांनी भेट देखील घेतली आहे. आता मतदान फिक्त करण्यासाठी दुसऱ्या भेटीची तयारी सुरू आहे. दुसरीकडे आपल्याच पक्षाला जादा जागा कशा मिळतील यासाठी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. एकिकडे आपल्याच गटाला जादा जागा मिळाव्यात यासाठी दबावतंत्र अवलंबण्यात येत आहे. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये राडा होत आहे. त्यामुळे गोकुळचे वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा देखील सुरू आहे.
गोकुळमध्ये विरोधकांकडे ५ हजार ठराव असो किंवा साडेचार हजार संस्था असो विजय आमचा निश्चित आहे, असे आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता खासदार महाडिक म्हणाले, आमच्या बाजूने ४ हजार ४०० दूध संस्था असताना गोकुळमध्ये आमचा पराभव कसा होईल, उलट पराभव समोर दिसू लागल्याने विरोधक नैराश्येतून आरोप करू लागले आहेत. त्यांच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल.
गोकुळच्या जागा वाटपाबाबत सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता खासदार महाडिक म्हणाले, प्रत्यके पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षाला जादा जागा मिळाव्यात असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे नेते कार्यकर्त्यांसाठी आग्रही असतात. याचा अर्थ जागा वाटपावरून आमच्यात तणाव आहे, असे नाही. यावेळी महापौर रुपाराणी निकम, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, राजवर्धना, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर, महेश जाधव, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.