Politics : 'सहकारात पक्षीय राजकारणाचा पायंडा सतेज पाटलांनी पाडला', महाडिकांची टीका
सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जाणार आहेत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमच्यासोबत असणार आहेत. गोकुळसह येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाडिक म्हणाले, सहकारी संस्थांमध्ये पक्षीय राजकारण आणू नये या मताशी आपण सहमत आहे. पण सहकारी संस्थांमध्ये पक्षीय राजकारणाचा पायंडा आमदार सतेज पाटील यांनी पाडला.
गोकुळच्या मागील निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना आमदार पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना हाताशी धरुन महाविकासच्या अंतर्गत जिल्ह्यातील नेत्यांची बांधणी केली. यामधील काही नेते आमच्यासोबत येणार होते, मात्र त्यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून आमदार पाटील यांना दबाव आणला आणि गोकुळची सत्ता मिळवली असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
ठेवी किती, वासाचे दूध किती परत केले
आमदार पाटील यांनी मागील निवडणुकीत दोन मुद्दे घेऊन निवडणूक लढवली. त्यांनी 2019 मध्ये असणाऱ्या गोकुळच्या ठेवी आणि आता असणाऱ्या ठेवी याची माहिती जाहीर करावी. तसेच चार वर्षात वासाचे दूध किती काढले, त्यापैकी किती दूध परत केले.
जिल्ह्यात दोन हजार दूध संस्था वाढल्या त्या तुलनेत दूध संकलन किती वाढले आदी गोष्टींचा खुलासा करावा, असे आव्हान खासदार महाडिक यांनी दिले. आता शेतकऱ्यांना 12 रुपये दरवाढ दिल्याचे ते सांगत आहेत. पण ही दरवाढ ग्राहकांवर लादूनच शेतकऱ्यांना दिली आहे, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले.
पुढील निवडणुकीत चित्र बदलेल
जिल्ह्यात दोन हजार दूध संस्था वाढल्या आहेत. पुढील निवडणुकीत एकतर्फी विजय मिळणार असे काहीजण सांगत आहेत. वाढलेल्या दोन हजार संस्थांचा त्रास हा मूळ जुन्या दूध संस्थांना होत आहे. या संस्था वाढवून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. 3600 दूध संस्थांना गोकुळमध्ये कशा पद्धतीने कारभार सुरु आहे, हे समजले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत चित्र बदललेले दिसेल, असे महाडिक यांनी सांगितले.
गोकुळच्या घडामोडींपासून अलिप्त
गोकुळमध्ये गेल्या 20 दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींपासून मी पूर्णत: अलिप्त आहे. यामध्ये माझा कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता. नविद मुश्रीफ यांनी महायुतीचा नेता म्हणून माझी भेट घेतली असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.
15 ऑगस्टपासून ई-बस धावणार
बुद्ध गार्डन येथील ई-बस स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुलै 2025 अखेर पर्यंत येथील वीज कनेक्शन आणि चार्जिंग पॉईंटचे काम पूर्ण होईल. यानंतर 15 ऑगस्टपासून शहरात ई-बस धावतील. कोल्हापूरसाठी एकूण 150 ई-बस मंजूर असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 50 बस येणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
...त्यांचा मुघलांचा घोडा होतो
महाडिकांचे नाव घेतले की त्यांच्या मुघलांचा घोडा होतो. त्यांना पाण्यात आम्ही दिसू लागतो. निवडणुकीचा मुद्दा बाजूला ठेवून महाडिकांचे टँकर, पेट्रोल पंप, कारखाना एवढेच त्यांना दिसते आणि निवडणुकीच्या मूळ मुद्यावरुन मतदारांचे लक्ष विचलित करण्याचे काम ते करतात, असा आरोप खासदार महाडिक यांनी केला.
कोल्हापूरमधील सर्व रस्ते सिमेंटचे करणार
कोल्हापूरमधील खराब रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार आहे. यासाठी शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणार आहे. मनपा अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकार देणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.