धामणी वासियांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
गगनबावडा प्रतिनिधी
गतवर्षी प्रशासनाने जाहिर केल्याप्रमाणे धामणी धरणात जून २०२४ चे किमान एक टिएमसी पाणी अडविण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने धामणी मध्यम प्रकल्पाचे गतीने काम करावे या प्रमुख मागणीसाठी धुंदवडे व धामणी खोरीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन दिले.
गगनबावडा,पन्हाळा व राधानगरी या तीन तालुक्यातील ४० गावांत हरितक्रांती घढविणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पाचे काम २३ वर्षांपासून अर्ध्यावरच रखडले आहे.येथील जनतेने वेळोवेळी बैठका,मोर्चे, उपोषण,बैठका,बहिष्कार यासारखी आंदोलने केली आहेत.डिसेंबर २००० साली दिडशे कोटी किंमत असणाऱ्या प्रकल्पाची किंमत सध्या ९०० कोटींवर गेली आहे.आजही येथील जनतेला पाणी,पाणी करायची वेळ आली आहे.फेब्रुवारी पासून पाणीटंचाई निर्माण होते.पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते.पिके कोमजल्याने कष्ट वाया जाते.
गतवर्षी जानेवारी २०२२ मध्ये आमदार प्रकाश आबीटकर,प्रभारी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत या धरणाचे काम पूर्ववत सुरु केले होते.निधीची तरतूद,वनविभाग व पूनर्वसन ही कामे मार्गी लावून २०२४ च्या पावसाळ्यात पाणी अडविणारच असे जाहीर केले होते.पश्चिमेकडील कालव्याचे काम सुरू आहे. त्यामूळे येथील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.या ना त्या कारणाने अलीकडेच हे काम अगदी संथ गतीने सुरू आहे.वेग मंदावल्याने पाणी अडविण्यासाठी आणखी काही वर्षे लागणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.चाळीस गावातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन येथील लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभाग यांची बैठक घेऊन कामाचा वेग वाढवून येत्या पावसाळ्यात पाणी अडवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी महेश आठल्ये, रामदास चौगले,शहाजी पाटील मनोज देसाई, गजानन चौधरी, पांडूरंग पाटील,विजय केरबा पाटील,समिर तांबोळे,आकाश चौगले,धनाजी पाटील इत्यादीसह धामणी खोरा क्रुती समितीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
खरं तर हा प्रकल्प २.८५ टिएमसीचा आहे.पण धामणी काठावरील सुळे पासून राई पर्यंतच्या गावांना पूरेल इतका किमान एक टिएमसी पाणीसाठा करावा यासाठी शेतकरी वर्गातून तिव्र भावना व्यक्त होत आहेत.