Dhamani Prakalp: 25 वर्षांचा पाण्याचा दुष्काळ संपला, धामणी प्रकल्पात प्रथमच पाणीसाठा
खोऱ्यातील जनतेतून आनंद व्यक्त, पाणी टंचाईतून होणार मुक्तता
By : युवराज भित्तम
म्हासुर्ली : मागील पंचवीस वर्षांपासून अनेक कारणांनी बहुचर्चित असलेला, तीन तालुक्यात विस्तारलेल्या व पाणी टंचाईने ग्रासलेल्या धामणी खोऱ्यास वरदान ठरणाऱ्या राई (ता. राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पात यावर्षी प्रथमच पाणीसाठा करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धामणी खोऱ्यातील जनतेतून आनंद व्यक्त होत आहे.
राधानगरी पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात विस्तारलेला धामणी खोरे स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणीटंचाईने ग्रासलेला होता. या परिसरातील पाणीटंचाई निवारणा करिता १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात राई येथील धामणी नदीवर मध्यम प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली. मात्र संबंधित प्रकल्पात राधानगरी-दाजीपूर अभयारण्याची जमीन बुडीत होत असल्याकारणाने प्रकल्पाचे काम रेंगाळले होते.
त्यानंतर क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, कॉम्रेड भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली धामणी खोऱ्यातील जनतेने मोर्चाद्वारे उठाव करत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पन्हाळा-बावड्याचे तत्कालीन आमदार विनय कोरे यांच्या पाठपुराव्याने धामणी धरणाची जागा ६०० मीटर खाली घेत प्रत्यक्षात २००० साली प्रकल्पाचे काम मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आले होते.
पहिली काही वर्षे जोरदार काम सुरू ठेवण्यात आले होते. पुन्हा निधीची कमतरता व धरणग्रस्ताच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे काम बंद पडले होते. तसेच शासनाच्या जलसिंचन घोटाळ्यात धामणी प्रकल्पाचे नाव आल्याने या प्रकल्पाचे भविष्य अंधकारमय झाले होते. या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करत सदर प्रकल्पाला सिंचन घोटाळ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
धामणी प्रकल्पास कोट्यावधीचा निधी मंजूर होऊन गेल्या दोन वर्षापासून प्रत्यक्ष काम सुरू झाले. मात्र घळरभरणीचे काम मागे राहिल्याने प्रत्यक्ष पाणी साठवणूक करण्यास अडचणी येत होत्या. याबाबत धामणी खोऱ्यातील तरुणांनी एकत्र येत जनतेच्या साथीने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पुन्हा एकदा लोकप्रतीनिधींच्या प्रयत्नाने अल्पावधीत पूर्ण झाले आहे.
सध्या धामणी खोऱ्यात गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊस सुरु असून शनिवार सकाळी ११ वाजता प्रकल्प पूर्ण भरला आहे. सध्या प्रकल्यात १.२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर सिंचन विमोचक मधून १६१७.३९ क्यूसेक्स तर वळण कालव्यामधून ३३५.५५ क्यूसेक्स असा एकूण १९५२.९४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग धामणी नदी सुरु आहे.