For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धामणे-वडगाव रस्त्यावर मोठ्या भेगांमुळे वाहनांचे चाक अडकून अपघाताचा धोका

10:28 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
धामणे वडगाव रस्त्यावर मोठ्या भेगांमुळे वाहनांचे चाक अडकून अपघाताचा धोका
Advertisement

धामणे : वडगाव ते धामणे मेन रोड अनेक समस्यांच्या विळख्यात अडला असल्याने रहदारी करणाऱ्या सर्वच वाहनधारकांना वाहन चालवितेवेळी जीव मुठीत घेवून वाहन चालवावे लागत आहे. वडगावपासून धामणे पाच किलो मीटर अंतर आहे. या मुख्य रस्त्यावर मोठ्या लांबच्या लांब भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या भेगांमध्ये दुचाकी वाहनाचे चाक अडकून आतापर्यंत 4 ते 5 दुचाकी वाहनधारक पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वडगाव-धामणे हा रस्ता अरूंद असून या रस्त्याने शहराकडे ये-जा करण्याची रहदारी जास्त प्रमाणात असून या रस्त्याने अवजड वाहने आणि दोन बसगाड्या बेळगाव ते धामणे सतत फेऱ्या मारत राहतात. या रस्त्याच्या दुतर्फा शेती असल्याने रस्त्याशेजारील शेतकरी आपल्या शेतातून गेलेला रस्ता कट करून ती माती रस्त्याच्या कडेवर टाकत आहेत. त्यामुळे अरूंद असलेला रस्ता पुन्हा अरूंद होत आहे. त्यामुळे रस्त्याने अवजड वाहन आले असता विरूद्ध देशेने येणाऱ्या वाहनचालकाला तारेवरची कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे वडगावपासून धामणे गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. या सर्वप्रकाराने या रस्त्याने ये-जा करणारे सर्वच वाहनचालक या रस्त्याला कोण वाली आहे की नाही, अशी विचारणा करत आहेत. निदान या रस्त्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उद्भवलेल्या सर्व समस्यांबाबत तातडीने लक्ष पुरवून समस्या दूर कराव्यात, अशी मागणी धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.