डीजीपी के. रामचंद्रराव यांचे निलंबन
कर्मचारी-प्रशासन सुधारणा खात्याच्या सचिवांचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
रासलिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे पोलीस महासंचालक के. रामचंद्रराव यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा हा आदेश जारी केला.
सरकारी कार्यालयात गणवेशात असताना महिलेसोबत असभ्य वर्तन करतानाचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला होता. त्यामुळे रामचंद्रराव 10 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर गेले होते. दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्यांना निलंबित केले आहे. कर्नाटक केडरच्या 1993 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे के. रामचंद्रराव यांच्या रासलिलेच्या व्हिडिओमुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. रामचंद्रराव यांनी अखिल भारत सेवा नियम 1968 च्या नियम 3 चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याचे सचिव के. व्ही. अशोक यांनी निलंबनाचा आदेश बजावला आहे.
अखिल भारत सेवा नियमांतर्गत अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याई करण्याचा असणाऱ्या अधिकार वापरून के. व्ही. अशोक यांनी रामचंद्रराव यांना सेवेतून निलंबित केले आहे. तसेच त्यांची अंतर्गत चौकशीचाही आदेश देण्यात आला आहे. निलंबनाच्या कालावधीत नियमानुसार भत्ता मिळविण्यास रामचंद्रराव हे पात्र ठरतात. मात्र, या कारवाईच्या कालावधीत केंद्रस्थान सोडून त्यांनी अन्यत्र जाऊ नये, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
रामचंद्रराव यांच्यावरील आरोप
सावत्र मुलगी अभिनेत्री रान्या राव हिच्या सोने तस्करी प्रकरणात प्रोटोकॉलचा दुरुपयोग केल्याचा आरोप डीजीपी के. रामचंद्रराव यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले होते. म्हैसूरच्या इळवाल येथे 2014 मध्ये दरोडा प्रकरणात जप्त केलेल्या पैशांचा दुरुपयोग केल्याचा आरोपही रामचंद्रराव यांच्यावर झाला होता. या प्रकरणामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, सीआयडी तपासात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत. 30 नोव्हेंबर 2017 मध्ये धर्मराज चडचण याच्या संशयास्पद एन्काऊंटर प्रकरणात तसेच गंगाधर चडचड याच्या हत्या प्रकरणात रामचंद्रराव यांच्या कार्यपद्धतीवर संशय घेण्यात आला होता.
अहवाल आल्यानंतर कारवाई : डॉ. जी. परमेश्वर
रासलिलेच्या व्हिडिओ प्रकरणात आयपीएस अधिकारी के. रामचंद्रराव यांना निलंबित केले आहे. राज्यातील कोणत्याही खात्यात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा पूर्ण प्रमाणातील तपास अहवाल आल्यानंतर रामचंद्रराव यांच्यावर कारवाई करण्यात येईल. व्हायरल व्हिडिओबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. अशा घटना कोणत्याही खात्यात घडू नयेत यासाठी तातडीने कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले.