डीजीएमओ राजीव घई यांची उप-सेनाप्रमुखपदी नियुक्ती
केंद्र सरकारकडून नवी जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने दिलेल्या ब्रीफिंगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले लेफ्टनंट जनरल आणि डीजीएमओ राजीव घई यांच्यावर विश्वास दाखवत सरकारने आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना उप-सेनाप्रमुख (रणनीती) या पदावर बढती देण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीसोबतच त्यांच्याकडील लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) पदही कायम राहणार आहे. यापूर्वी घई यांना गेल्या आठवड्यात उत्तम युद्ध सेवा पदक (यूवायएसएम) प्रदान करण्यात आले होते.
लेफ्टनंट जनरल आणि डीजीएमओ राजीव घई यांच्या या नियुक्तीतून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आधुनिक युद्धात तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आहे. गेल्या महिन्यात ऑपरेशन सिंदूरशी संबंधित लष्करी ब्रीफिंगमध्ये ते सैन्यातील एक महत्त्वाचा चेहरा होते.
उप-सेनाप्रमुख (रणनीती) हे एक नवीन पद असून भारतीय सैन्याच्या ऑपरेशन्स आणि इंटेलिजेंस डायरेक्टरेट तसेच इतर महत्त्वाच्या शाखांचे निरीक्षण करेल. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, हे पद भारतीय सैन्यातील सर्वात महत्त्वाच्या नियुक्त्यांपैकी एक मानले जाते. आता भारतीय सैन्याचे सर्व ऑपरेशनल व्हर्टिकल्स उप-सेनाप्रमुख राजीव घई यांना अहवाल देतील.