For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीजीसीआयकडून बेंगळूरमध्ये करचुकवेगिरीचा पर्दाफाश

12:48 PM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
डीजीसीआयकडून बेंगळूरमध्ये करचुकवेगिरीचा पर्दाफाश
Advertisement

सुमारे 593 कोटी रुपयांची जीएसटी फसवणूक : एकाला अटक : 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Advertisement

बेळगाव : वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालय (डीजीजीआय) बेळगाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी 593 कोटी रुपयांचा बनावट बिल फसवणुकीचा पर्दाफाश केला. बेंगळूरमधील स्टार टॅक्स कन्सल्टंटशी संबंधित जागांवर शोधमोहीम राबवून बनावट इन्पुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणी मोहम्मद सैफुल्लाह याला केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली असून बेळगाव येथील चौथ्या जेमएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

डीजीसीआयने बनावट आयटीसी रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानुसार बेंगळूर येथील स्टार टॅक्स कन्सल्टंटवर छापा टाकला असता त्यावेळी कोट्यावधी रुपयांची बनावट बिले काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्या विविध जागांवर शोधमोहीम राबविली असता जीएसटी न भरता बनावट बिले तयार करण्यात आली होती. यामध्ये 235 कोटी रुपयांचे आयटीसी देण्यात आल्याचेही उघडकीस आले. प्राथमिक तपास करताना सैफुल्लाहकडून जीएसटी नोंदणी केवळ बनावट बिले आणि ई-वे बिल तयार करण्यासाठी चालविली जात असल्याचे दिसून आले.

Advertisement

आरोपीने ऑनलाईन अकाऊंटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून अनेक बनावट संस्थांद्वारे व्यवहार केल्याचे आढळून आले. तसेच आरोपीने अस्तित्वात नसलेले व बनावट जीएसटीद्वारे कमिशनच्या बदल्यात बनावट बिले तयार करून देत असल्याचे आढळून आले आहे. सैफुल्लाहने आपला गुन्हा कबुल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला बेंगळूर येथील आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सैफुल्लाहची बेळगावला रवानगी करण्यासाठी ट्रांझिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर त्याला चौथ्या जेएमएफसी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Advertisement
Tags :

.