देवसू पंचक्रोशी गेले तीन दिवस अंधारात
महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा संताप
सावंतवाडी
गेले तीन दिवस देवसू पंचक्रोशीतील अनेक घरे वीज पुरवठ्याअभावी अंधारात असून नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत . दाणोली बाजारपेठ , देवसू , दाणोली गावठण , पारपोली , केसरी , ओवळीये , फणसवडे , सातुळी , गावात वीज नसल्याने काळोखाचे साम्राज्य पसरले आहे . याचा फटका अनेक दुकानदार , व्यावसायिकांना बसत असून सर्वांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे . यासंबंधी महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता दुरुस्तीचे काम चालू आहे असे सांगितले जात आहे. विजेअभावी गावात पाण्याचे तीव्र हाल नागरिकांना सहन करावे लागत आहेत . त्यामुळे एका दिवसाच्या मान्सूनपूर्व पावसामुळे असे हाल होत असतील तर पावसाळा सुरु झाल्यावर परिस्थिती काय असेल असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत असून त्यांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे .