भजनातून मन:शांती अन् समाधान मिळते
हभप यल्लाप्पा गिरमल महाराज यांचे प्रतिपादन : सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेला प्रारंभ
प्रतिनिधी/ बेळगाव
भजन हे केवळ कलियुगापुरते मर्यादित नसून सत्ययुग, त्रेतायुग व द्वापरयुगातही भजनाची परंपरा होती. भजनामुळे मन तृप्त होते, समाधान मिळते व मन प्रसन्न राहते. भजनामध्ये मोठी शक्ती असून त्याचे महत्त्व ओळखून साधुसंतांनी भक्तांसाठी भजनाचा मार्ग खुला केला. त्यामुळे प्रत्येकाने भजन परंपरेचे महत्त्व जपावे, असे प्रतिपादन हभप यल्लाप्पा गिरमल महाराज (सांबरा) यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित 10 व्या संगीत भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठा मंदिरच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष रघुनाथ बांडगी यांनी स्वागत केले.
गिरमल महाराज म्हणाले, 1977 पासून संभाजी उद्यानात सुरू झालेल्या ज्ञानेश्वरी पारायणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परंपरेला 48 वर्षे पूर्ण झाली असून आपण गेली 48 वर्षे सुमारे 800 भक्तांसह नियमितपणे पायी वारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
या संगीत भजन स्पर्धेत एकूण 29 भजनी मंडळांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी 5 महिला भजनी मंडळांनी भजने सादर केली. तत्पूर्वी सदाशिवनगर येथील श्रीहरी महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
स्पर्धेच्या पुढील टप्प्यात गुऊवारी महिला गटातील 11 भजने सादर होणार आहेत. शुक्रवारी व शनिवारी पुऊष गटातील 13 भजने सादर केली जाणार आहेत. भजन परंपरेला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेचा नागरिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रसन्न हेरेकर यांनी सूत्रसंचालन तर सहकार्यवाह शिवाजी हंगिरकर यांनी आभार मानले.
