देवी लईराईची भक्तीपर्वणी निविर्नपणे उत्साहात
सरकार, प्रशासन, पोलिसांचे सहकार्य ठरले महत्वाचे : कृतज्ञ भावनेने मनोमन लईराईला केले वंदन
डिचोली : गेल्यावर्षी शिरगावातील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवात होमकुंड मार्गक्रमणावेळी झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर यावर्षीच्या या महान जत्रोत्सवाबद्दल प्रत्येक धोंडगण, भाविक व स्वत: शिरगाववासियांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. मात्र सरकार, प्रशासन व पोलिसांनी योग्य नियोजन करून जत्रोत्सव सुरळीतपणे साजरी करण्यास मोठे योगदान दिले. त्यामुळे भाविकांच्या मनातील भीती दूर झाली. पहाटे सर्व धोंडगणांचे अग्निदिव्य मार्गक्रमण होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर देवी लईराईच्या अग्निदिव्य मार्गक्रमण करताच भाविकांबरोबरच पोलिस व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही मोठ्या कृतज्ञ भावनेने देवीला प्रणाम करून मनोमन देवीचेही आभार मानले.
गेल्यावर्षीची चेंगराचेंगरी व त्यात सहा जणांचा झालेला दुर्दैवी अंत हा क्षण आजही तितकाच सर्वांचीच मने हेलावून सोडतो. यंदा त्या धोकादायक उतरणीवर पोहोचल्यावर तो क्षण आठविल्याशिवाय राहिला नाही. जत्रोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक धोंडगण व भाविकाला चेंगराचेंगरी झालेल्या घटनास्थळी दाखल झाल्यावर मागील घटनेचे स्मरण होत राहिले. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकीत यादव, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही., उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई, इतर भागातील मामलेदार, तलाठी, पोलिस उपअधीक्षक निरीक्षक, उपनिरीक्षक व इतर जबाबदारी असलेले सर्व कर्मचारी तळ ठोकून उपस्थित होते. रात्री गर्दी वाढून देवीचा कळस मंदिरातून बाहेर काढताच संपूर्ण रस्ता धोंडगणांनी व्यापला होता. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात

आलेले नियोजन काटेकोरपणे पाळण्यात आले. धोंडगणांशिवाय इतर कोणालाही तळीजवळ जाण्यापासून रोखण्यात येत होते. या गोष्टीकडे पोलिसांबरोबरच स्वत: जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी लक्ष ठेऊन होते. प्रसंगी ते स्वत: धोंडगण व लोकांना मार्गदर्शन करीत होते. गेल्यावर्षी चेंगराचेंगरी झालेल्या रस्त्याच्या समांतर असलेल्या दुसऱ्या रस्त्यावर धोंडगणांच्या रांगा करण्यात आल्या होत्या. याही रांगा गटागटाने करण्यात येत असल्याने कोणतीही धक्काबुक्की किंवा घाईगडबड दिसून येत नव्हती. सर्वकाही सुरळीतपणे सुरू होते. सर्व व्यवस्था पोलिसांनी आपल्या हाती घेऊन धोंडगणांना व भाविकांना कोणताही त्रास न होता पध्दतशीर सर्व गोष्टी जुळवून आणल्या.
आमदार प्रेमेंद्र शेट पहाटेपर्यंत शिरगावात
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सकाळपासून पोलीस नियंत्रण व सूचना कक्षात तळ ठोकला. तेथे टिव्ही संचावर सीसीटीव्ही केमेरांद्वारे संपूर्ण शिरगावातील परिस्थितीची ते बारकाईने पाहणी करीत होते. धोंडांची तळी, मूड्डी मंदिर, धोंडगणांच्या रांगा, होमकुंड मार्गक्रमण तसेच गर्दी होणाऱ्या भागाची जवळून निरीक्षण करून संबंधित पोलीस किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून वारंवार माहिती देत होते. धोंडगणांचे अग्निदिव्य मार्गक्रमण पूर्ण होऊन देवीचा कळस होमकुंड पार करण्यासाठी मुड्डी मंदिरातून बाहेर पडला त्यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी नियंत्रण कक्ष सोडून होमकुंड स्थळी दाखल झाले. देवीच्या होमकुंड मार्गक्रमणाचा क्षण पाहून गर्दी कमी झाल्यानंतरच पहाटे आमदार शेट शिरगावातून मयेतील आपल्या निवासस्थानी रवाना झाले.

भाविकांसाठी पुरशी पाण्याची व्यवस्था
शिरगावात यावर्षी दुकाने थाटण्यास मनाई असल्याने शिरगावात येणाऱ्या भाविक व धोंडगणांना पिण्याच्या पाण्याची समस्या भासण्याची शक्यता होती. त्यादृष्टीने पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे होते. त्यासाठी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वत: सुमारे 50 हजार अर्धा लीटर पिण्याच्या पाण्याच्या सिलबंद बाटल्या उपलब्ध केल्या. तसेच पोलिसांकडूनही भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व बाटल्या पोलीस नियंत्रण व सूचना कक्षात ठेवण्यात आल्या होत्या. मोठ्या संख्येने भाविक व धोंडगणांना या सोयीचा लाभ झाला. जत्रोत्सवाच्या दिवसभर व रात्री, पहाटेपर्यंत भाविक व धोंडगण मोफत पाणी घेऊन आपली तहान भागवत होते.
अधिकारी, पोलिस पहाटेपर्यंत होते तैनात
सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना या जत्रोत्सवासाठी बनविण्यात आलेल्या सहा विभागांमध्ये जबाबदारी देण्यात आली होती. जत्रेला प्रारंभ झाल्यानंतर सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी स्विकारत विभागात उपस्थिती लावली होती. सर्व विभागातील पोलिसांनी आपापली कामगिरी उत्कृष्टपणे बजावली.