For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

निरपेक्षतेने भक्ती केली की आत्मज्ञान प्रकट होते

06:19 AM Oct 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
निरपेक्षतेने भक्ती केली की  आत्मज्ञान प्रकट होते
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना अत्यंत गुह्य असे हे ब्रह्मज्ञान, प्रपंचज्ञानासह, तुला पुन्हा सांगतो. हे जाणल्याने तू अशुभातून मुक्त होशील ह्या अर्थाचा  आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ।। 1 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. अर्जुन हा भगवंतांचा अतिशय आदर करत होता. तो आसुयारहित, निर्मळ असल्यामुळे, भगवंत त्यांच्या हृदयातील गुप्त गोष्ट त्याला सांगायला सहजी तयार झाले.

पुढे भगवंत म्हणाले, अर्जुना, स्तनात दूध असते आणि त्याची गोडी लेकराला असते. याकरता लेकराची स्तनपानाची इच्छा तृप्त झाली की मातेला आनंद होतो किंवा ज्याप्रमाणे कणगीतून बी काढले, आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते वाया जात नाही त्याप्रमाणे चांगल्या मनाचा, शुद्ध बुद्धीचा, कुणाची निंदा न करणारा, एकनिष्ठ श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गुह्य गोष्ट वक्त्याने खुशाल सांगायला हरकत नाही. सध्या असा श्रोता तुझ्यावाचून दुसरा कोणी मला दिसत नाही, म्हणून जरी गोष्ट गुप्त असली तरी ती मी तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही. आता तुला प्रपंचज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे वेगवेगळे करून सांगतो.

Advertisement

येथे भगवंत अर्जुनाला ब्रह्मज्ञान, प्रपंचज्ञानासह, तुला पुन्हा सांगतो असे म्हणत आहेत कारण सातव्या अध्यायात विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो। जे जाणूनि पुढे येथे जाणावेसे न राहते।।7.2 ।। ह्या श्लोकात सांगितल्यानुसार प्रपंच व ब्रह्मज्ञान ह्याबद्दल देवांनी माहिती देऊन झालेली आहे. आपल्यातच गुप्त असलेले आत्मज्ञान सोडून समोर दिसणाऱ्या सर्व वस्तू विज्ञान म्हणून ओळखल्या जातात. मायेच्या सहाय्याने विज्ञान ह्या सदराखाली भगवंतांनी अखिल ब्रह्मांडाचा प्रपंच त्यांनी कसा मांडला आहे हे सविस्तर सांगितले होते. परा माया, अपरा माया तसेच सर्व निसर्गामध्ये ते कसे व्यापून राहिले आहेत, समस्त प्राण्यांवर त्यात मनुष्यही आलाच. मायेचा पगडा कसा आहे हेही त्यांनी सांगितले. एखाद्याने स्वत:च्या बळावर ही मायानदी तरुन जायचे ठरवले तर ते अशक्य आहे म्हणून त्यासाठी मला शरण या असा उपायही श्रोत्यांना सांगितला आहे. पुढे भक्तांचे प्रकार सांगून जो निरपेक्षतेने माझी भक्ती करतो, त्याच्यातील आत्मज्ञान प्रकट होते त्यामुळे त्याचा मी उद्धार करतो असा निर्वाळाही दिलेला आहे. सध्या आपण अभ्यासत असलेल्या नवव्या अध्यायाच्या सुरवातीला आधीच सांगून झालेल्या ज्ञान विज्ञानाबद्दल देव पुन्हा का सांगत आहेत असे वाटणे साहजिक आहे. ह्याचं एकच कारण म्हणजे, ह्यापूर्वी देवांनी माणसाने स्वत:चा उद्धार कसा करून घ्यावा ह्याबद्दल सांगितले असले तरी आपण त्यांचे न ऐकता स्वत:चे डोके चालवतो आणि आपला घात करून घेतो. असे होऊ नये म्हणून ते पुन्हा ज्ञान आणि विज्ञान ह्यातील फरक समजावून सांगत आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.