For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबरा यात्रेसाठी लोटला भाविकांचा जनसागर

06:33 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांबरा यात्रेसाठी लोटला भाविकांचा जनसागर
Advertisement

घरोघरी स्नेहभोजनाचा बेत : भाविकांचे लोंढे दाखल: रहदारी सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

Advertisement

सांबरा/वार्ताहर

सांबरा येथे सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेसाठी शनिवारी भाविकांचा जनसागर लोटल्याने बेळगाव-सांबरा रोडवर वाहनांचा चक्काजाम झाला होता. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.

Advertisement

शनिवारी गावामध्ये घरोघरी स्नेहभोजनाचा बेत असल्याने सकाळी 11 पासूनच भाविकांचे लोंढे गावात येऊ लागले. बघता बघता बेळगाव-सांबरा रोडवर वाहनांची गर्दी वाढली व दुपारी साडेबारानंतर वाहतूक कोंडीत वाढ झाली. सांबरा ते बाळेकुंद्रीपर्यंत व सांबरा ते निलजीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालकांनी मुतगा येथेच वाहने लावून पायी चालत जाणे पसंद केले. सुळेभावी भागातून येणाऱ्या वाहनचालकांनी बाळेकुंद्री खुर्द नजीकच्या रस्त्यावर वाहने पार्क केली. सुऊवातीला पोलिसांची संख्या कमी होती. त्यामुळे त्यांना रहदारीवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे बेळगाव येथून रहदारी पोलीस सांबरा मार्गावर दाखल झाले. पोलिसांनी रहदारी सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तरीही रहदारीवर नियंत्रण मिळविणे त्यांना शक्य झाले नाही. अखेर रहदारी पोलिसांनी बेळगावहून नेसरगी, यरगट्टीकडे जाणारी अवजड वाहने दुसऱ्या मार्गाने वळविल्याने रस्ता काही प्रमाणात खुला झाला. मात्र सायंकाळी पुन्हा वाहनांच्या गर्दीत वाढ झाली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसांना कसरत करावी लागली.

 नेटवर्क जाममुळे गैरसोय

शनिवारी सांबरा येथे नेटवर्क जाम करण्यात आला. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली. नेटवर्क जाममुळे कुणालाही कॉल लागत नव्हते. त्यामुळे पाहुण्यांचे घर शोधण्यास भाविकांना कठीण होऊन बसले. अनेक भाविक स्नेहभोजन न करताच माघारी फिरले. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गदगेच्या ठिकाणी श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवीच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, गणेशनगर भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली. ग्रामपंचायतीच्या या कारभाराबद्दल नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. त्यांनी काही वेळ रस्ता अडवून ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध केला. यावेळी काहींनी त्यांची समजूत काढून रस्ता खुला करून दिला.

 सांबऱ्याला जाण्यासाठी पर्यायी मार्गांचाही अवलंब करा

शनिवारची गर्दी लक्षात घेता भाविकांनी केवळ बेळगाव-सांबरा रस्त्याचा वापर न करता मुतगा-सांबरा, अष्टे-सांबरा, बाळेकुंद्री खुर्द-सांबरा व बसरीकट्टी-सांबरा या पर्यायी रस्त्यांचाही वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.