For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भक्त भगवंताचा आश्रय घेऊन म्हातारपण व मृत्यूवर मात करतात

06:40 AM Aug 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
भक्त भगवंताचा आश्रय घेऊन  म्हातारपण व मृत्यूवर मात करतात
Advertisement

भगवंत म्हणाले, माणसाच्या इच्छा कधी संपत नसल्याने त्याला विषय अधिकाधिक आवडू लागतात. त्या नादात तो आत्मस्वरुपाला विसरतो आणि आजूबाजूच्या दृश्य गोष्टींच्या मोहात पडतो. त्यामुळे ईश्वराची भक्ती करून ह्यातून सुटण्याचा प्रयत्न करावा असे त्याला कधी वाटत नाही. चुकून ईश्वराची भक्ती करावी असे वाटू लागले तर लगेच अनेक अनिष्ट कल्पना त्याला भेडसावू लागतात. त्यामुळे तो जन्मोजन्मी महादु:खे सोसत संसाररूप अरण्यात अडकून पडतो. ईश्वर अविनाशी आहे आणि विश्व विनाशी आहे हे ज्यांच्या लक्षात येते ते ह्या विश्वाचा नाद सोडून नित्यवस्तूच्या म्हणजे माझ्या भजनी लागतात आणि पुण्यकर्मे करून सुखदु:खाच्या रहाटगाडग्यातून निसटण्याचा प्रयत्न करतात. ह्या अर्थाचा

Advertisement

ज्यांनी झिजविले पाप पुण्य-कर्मे करूनिया । ते द्वंद्व-मोह तोडूनि भजती मज निश्चये ।। 28 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला म्हणले, विचारांच्या काट्याने स्वत:च्या शक्ती, बुद्धीबद्दल ज्यांच्या मनात गैरसमज निर्माण होत नाही ते भक्तीमार्गावर निष्ठा ठेऊन वाटचाल करू लागतात. ते भक्तीमार्गावर निश्चयाने वाटचाल करत असताना विपरीत विचारांच्या काट्यांना चिरडून टाकतात. वाटेवर त्यांना महापातकांची अरण्ये लागतात. त्यातील मोहाचे क्षण त्यांना खुणावत असतात पण दृढनिश्चयाने त्यांना दाद न देता ते सरळ पुढे चालत राहतात. नंतर, पुढे पुण्यकर्मे करत ते माझ्याजवळ येऊन पोहोचतात. पुण्यकर्मे करत राहिल्याने त्यांनी पूर्वी केलेली पापकर्मे निष्प्रभ होतात. अशा रीतीने ते काम, क्रोध आदि वाटमारी करणाऱ्या मंडळींच्या हातावर तुरी देऊन निसटतात.

Advertisement

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, जे अशा पद्धतीने म्हतारपण आणि मृत्यूवर मात करू इच्छितात त्यांना ब्रह्म आणि अध्यात्म ह्यांचे संपूर्ण ज्ञान होते.

झटती आश्रये माझ्या जरा-मृत्यु गिळावया । ते ब्रम्ह जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म हि ।।29।।

इच्छा, द्वेष, सुख, दु:ख ह्या विकारांमुळे काम, क्रोध बळावले की, माणसाने आपल्यावरील मायेचा विळखा घट्ट होत चालला असे समजावे. तो सैल होऊन नाहीसा होण्यासाठी, तुझ्याशिवाय माझी ह्यातून कुणी सुटका करणार नाही ह्या भावनेने त्याने ईश्वराला शरण जावे. एखादा विचार मनात पूर्ण ठसला की, माणसाची भावना तयार होते आणि मग ती कधी बदलत नाही. उदाहरणार्थ एखादा उत्तम मार्क मिळवून पास झाला असे समजले की, तो कसलाही विचार न करता सहज म्हणून जातो की, फार छान झाले. असे म्हणताना त्याला कोणताही विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही त्याप्रमाणे ईश्वर आपल्याला मायेतून सोडवेल ही भावना मनात पक्की ठेवावी आणि त्याला अनन्य भावाने शरण जावे हा उपाय भगवंत सांगतात. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की, स्वप्रयत्नाने मायेचा वेढा उठवणे शक्य नाही आणि तो उठल्याशिवाय जन्ममरणाच्या फेऱ्यांतून आपण सुटणार नाही हे माणसाच्या एकदा लक्षात आले की, मग त्यासाठी आवश्यक ते साधन करण्याला तो तयार होतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.