विशेष रेल्वेतून बेळगावचे भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी रवाना
48 तासांचा प्रवास, भोजनाची व्यवस्था, थेट रेल्वेसेवा
प्रतिनिधी/ बेळगाव
अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या रामलल्लांच्या दर्शनासाठी शनिवारी बेळगावमधून थेट रेल्वे सोडण्यात आली. बेळगाव व परिसरातील 200 हून अधिक भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी रवाना झाले. बेळगावमधून पहिल्यांदाच अयोध्येला थेट रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जानेवारी महिन्यात अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सध्या देशभरातून लाखो भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या येथे जात आहेत. रेल्वे विभागाने देशातील महत्त्वाच्या शहरांमधून विशेष रेल्वसेवाही सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बेंगळूर व म्हैसूर येथून अयोध्येसाठी थेट रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात बेळगावमधून विशेषफेरी सोडण्यात आली.
शनिवारी हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, चिकोडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. आर. के. बागी, नंदू देशपांडे, मुनीस्वामी भंडारी, कृष्णा भट, आनंद करलिंगण्णावर, अच्युत कुलकर्णी, विठ्ठल माळी, नैर्त्रुत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आसिफ व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. बेळगावमधून 200 हून अधिक भाविक अयोध्येच्या दिशेने रवाना झाले. एकूण 48 तासांचा अयोध्यापर्यंतचा प्रवास असणार आहे. कर्नाटकातील नागरिकांना बेळगावसह हुबळी, होस्पेट, यादगिर या ठिकाणी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश मिळविता येईल. या रेल्वेमध्ये जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी 10.35 वाजता निघालेली एक्स्प्रेस सोमवार दि. 19 रोजी सकाळी 10.35 वाजता अयोध्येला पोहोचेल. तर मंगळवारी 4.45 वाजता ही एक्स्प्रेस अयोध्या येथून बेळगावच्या दिशेने परतीचा प्रवास करेल.
अयोध्येसाठी साप्ताहिक रेल्वे सुरू करा
नैर्त्रुत्य रेल्वेने सध्या प्रायोगिक तत्त्वावर बेळगावमधून अयोध्येला एक फेरी जाहीर केली होती. या रेल्वेफेरीला भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे आता अयोध्येसाठी साप्ताहिक रेल्वेफेरी सुरू करण्याची मागणी होत आहे. बेळगावमधून थेट अयोध्येला रेल्वे नसल्याने मुंबई येथून नागरिकांना अयोध्येपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन साप्ताहिक रेल्वे सुरू करावी, असा आग्रह होत आहे.