‘उदो गं आई उदो’च्या गजरात भाविक सौंदत्तीला रवाना
अनगोळ : शाकंभरी पौर्णिमेनिमित्त अनगोळ येथील भाविक सौंदत्ती यल्लम्मा डोंगर येथे होणाऱ्या रेणुकादेवी यात्रेला गुऊवारी रवाना झाले. रेणुकादेवी मंदिर, भांदूर गल्ली, अनगोळ येथून भाविक देवीचा जग घेऊन वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत व ‘उदो गं आई उदो’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघाले.यावेळी गावातील देवस्की महिला, पंच मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भांदूर गल्ली, हणमण्णावर गल्ली, कलमेश्वर मंदिर, मरगाई मंदिरमार्गे संत मीरा रोडपर्यंत सवाद्य मिरवणुकीने आले. यावेळी महिलांनी आरती करून देवीचे दर्शन घेऊन भाविकांना निरोप दिला. तत्पूर्वी यल्लम्मा मंदिर भांदूर गल्ली येथे देवीच्या वाहनाचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अनगोळ विभागप्रमुख उमेश कुऱ्याळकर, श्रीकांत हंगिरगेकर, पुऊषोत्तम चौगुले यांच्या हस्ते पूजा करून निरोप देण्यात आला. सौंदत्ती देवस्थान येथे धार्मिक विधी व यात्रेचा कार्यक्रम पुजारी बेरडे यांनी जाहीर केला आहे.