तालुक्यातील भाविकांना आषाढी वारीचे वेध
विविध गावांतील दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ : टेम्पो, रेल्वे, खासगी वाहनातूनही भाविक रवाना
वार्ताहर/किणये
पंढरीची वारी, आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत, वृत्त एकादशी करीन उपवासी, गाईन अहरनिशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बिज कल्पांतीचे तुका म्हणे! संतश्रेष्ठ, जगतगुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे तालुक्यातील वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. आषाढी वारीसाठी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तालुक्याच्या विविध गावातून दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत. या दिंड्या शुक्रवारी सोलापूर येथे पोहोचलेल्या आहेत. तसेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यातील अनेक वारकरी व भक्त मंडळी टेम्पो, रेल्वे व खासगी वाहनातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहेत. तालुक्यातील वाघवडे व सावगाव या गावातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच दिंडी मार्गस्थ झालेली आहे. या दिंडीचे चालक भुजंग पाटील हे आहेत. या दिंडीत सुमारे 80 वारकऱ्यांचा सहभाग आहे. तसेच अष्टे, चंदगड, कंग्राळी खुर्द, मजगाव, कुद्रेमनी, कुसमळी आदी भागातील वारकऱ्यांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत.
अष्टे-चंदगड येथील दिंडीचे चालक हभप नागेंद्र सुभानजी आहेत. ही दिंडीही गेल्या आठ वर्षापासून सुरू आहे. तसेच नागेंद्र हे पायी वारी करतात. आषाढी, कार्तिकी व माघवारीला आपल्याला जमेल त्या पद्धतीने वारकरी पंढरपूरला जातात. आणि मनोभावे सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. भाग गेला, शिन गेला, अवघा झालासी अनंता असाच अनुभव प्रत्येक भक्ताला विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर येतोय. पायी दिंडीतून जाताना ऊन, पाऊस याची तमा बाळगत नाहीत. तसेच दिंडीमध्ये समतेचा भाव दिसून येतो. सारे जण सावळ्या विठुरायाच्या भजनात दंग होऊन मार्गस्थ होत असतात. अलीकडे तालुक्याच्या विविध गावांमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढलेली आहे. सांप्रदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळे तसेच तुकाराम गाथा पारायण सोहळे आदी आयोजित करण्यात येऊ लागले आहेत. या वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती मार्गदर्शन व कीर्तन, प्रवचन करण्यात येते. या माध्यमातून अनेक तरुणांना प्रोत्साहन मिळत आहे.