ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी सोहळ्यासाठी भाविक रवाना! वारकऱ्यामध्ये उत्साह
वारकऱ्यांच्यामध्ये मोठा उत्साह
सांगरूळ /वार्ताहर
आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी सोहळ्यासाठी सांगरूळसह परिसरातील भाविकांनी आळंदी कडे प्रस्थान केले आहे .
सांगरूळ सह परिसरात ह भ प गुरुवर्य वै .तात्यासाहेब वास्कर महाराज यांचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे . पायी दिंडी सोहळ्यासाठी सांगरुळ परिसरातील म्हारुळ ,बहिरेश्वर , कसबा बीड ,खाटांगळे पासार्डे आमशी बोलोली आडूर भामटे परिसरातील वारकरी संप्रदायासह भाविक मोठ्या प्रमाणात दरवर्षी सहभागी होत असतात .गावागावातील पन्नास ते साठ भाविकांच्या लहान मोठ्या दिंड्या सहभाग घेतात . नियोजन करणे, दिंडी सोहळ्यात पंधरा-वीस दिवस पुरेल एवढे जेवणाचे साहित्य, विसाव्यासाठी पाल व अन्य साहित्याची जमवाजमव करण्यासाठी गेले महिनाभर भाविकांची जोरदार लगबग सुरू होती.
सांगरूळ मधून चालू वर्षी चार ग्रुप दिंडी सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत . गावातील ह भ प मंडळाच्या वतीने बाहेरी मंडप पासून गावातील विठ्ठल मंदिर पर्यंत टाळ मृदंग व पखवाजाच्या तालात दिंडी काढून तसेच आरती व पूजन करून दिंडी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या . यानंतर हे सर्व वारकरी व भाविक दिंडी सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी आळंदीकडे रवाना झाले . हे सर्व भाविक तात्यासाहेब वासकर यांच्या रथा पुढील दिंडी क्रमांक एक व सात मध्ये सहभागी होणार आहेत .
दिंडी सोहळ्यासाठी युवराज लव्हटे, दिनकर तळेकर, धोंडीराम खाडे, वसंत खाडे बाळासो चव्हाण कृष्णात नाळे संभाजी चव्हाण बाळासो सासणे गजानन पोतदार संभाजी मोरबाळे शहाजी कांबळे दत्तात्रय मगदूम नकूबाई लव्हटे मंगल खाडे लक्ष्मी घुंगुरकर यांच्यासह दोनशेवर भाविक आळंदी कडे रवाना झालेत .
या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संताजी घोरपडे ,कृष्णात लव्हटे, विष्णूपंत तोरस्कर भाऊसो लव्हटे ,नवनाथ लव्हटे , भिकाजी सासणे भरत यादव गणपती लव्हटे, हिंदुराव तोरस्कर यांचे सह ह भ प मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .