पंढरपूरमध्ये बेळगावच्या भाविकाचा चंद्रभागेत बुडून मृत्यू
पंढरपूर :
आषाढी वारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना, पंढरपूरमध्ये आज शुक्रवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. चंद्रभागा नदीत बेळगाव येथील शुभम पावले (वय २७) या भाविकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
शुभम आपल्या मित्रांसोबत विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आला होता. सकाळी सुमारे सातच्या सुमारास तो चंद्रभागा नदीत, पुंडलिक मंदिराजवळ आंघोळीसाठी गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. प्रशासन व स्थानिक बचाव पथकाने केलेल्या चार तासांच्या शोधमोहीमेनंतर त्याचा मृतदेह नदीतून हाती आला.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीत भाविकांची मोठी गर्दी होत असून, पुराचा धोका लक्षात घेता सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून अधिक उपाययोजना करण्याची मागणी भाविकांमधून होत आहे.
विशेष म्हणजे, आजच सकाळी आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे पंढरपूर येथे बचावकार्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यात्रेच्या काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दहा जीवरक्षक बोटी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
उजनी धरण सध्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून, पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता भाविकांनी चंद्रभागा नदीत काळजीपूर्वक व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच स्नान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.