ऐतिहासिक वारसा दर्शविणारे आकर्षक सर्कल उभारणार,देवगडच्या ‘Y जंक्शन’चे 85 लाखांत सुशोभीकरण; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
या प्रकल्पांतर्गत Y जंक्शन येथे आकर्षक सर्कल उभारण्यात येणार असून, त्यामध्ये देवगडची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा पुतळा साकारण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच देवगडमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना येथील ऐतिहासिक वैभवाची ओळख करून देणारे हे ठिकाण ठरणार आहे. तसेच जंक्शनच्या सुधारणेमुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
‘देवगडकरांनी सांगितलेली कामे विसरलो नाही’
भूमिपूजनप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, देवगडच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. येथे प्रत्येक वेळी एखाद्या विकासकामाचे भूमिपूजन करून जाण्याचा आपला प्रयत्न असतो. गेल्या 12 वर्षांत देवगडकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि प्रलंबित प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे. आमदार असताना ज्या कामांसाठी पाठपुरावा केला, त्यातील अनेक कामे आता पालकमंत्री झाल्यानंतर मार्गी लागत आहेत. देवगडकरांनी सांगितलेली कामे आपण विसरलेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Y जंक्शनमुळे वाहतूक कोंडी कमी होणार
Y जंक्शनच्या कामाचे महत्त्व सांगताना राणे म्हणाले की, पर्यटन हंगामात तसेच 30 आणि 31 डिसेंबरच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. जंक्शनच्या सुधारणेमुळे हा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. वाहतूक व्यवस्था सुधारण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल. अशा विकासकामांमुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
खंदक गार्डनमधून 500 जणांना रोजगाराची संधी
देवगडमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगताना राणे यांनी खंदक गार्डनच्या सुशोभीकरणाचाही उल्लेख केला. या उद्यानामुळे पर्यटन वाढण्यास मदत होणार असून, त्यातून किमान 500 जणांना रोजगार मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवगडमध्ये नाट्यगृह, क्रीडांगण आणि सांस्कृतिक भवन यांसारखे प्रकल्पही साकारले जात आहेत.
कुणकेश्वर परिसरातील ताज समूहाच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचे काम पुढील 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात रोजगार मिळावा, यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्थाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक तरुणांना रोजगार देण्यावर भर
देवगडमधील तरुण-तरुणींनी स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावा, या मागणीसाठी एकत्र येऊन आवाज उठविल्याबद्दल राणे यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक तरुणांना नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. देवगडच्या विकासासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी नागरिकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याच्या प्रवृत्तीवर टीका करताना चांगल्या कामांना विरोध करण्याऐवजी सर्वांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. देवगडमधील मच्छीमारांच्या प्रश्नांवरही लक्ष दिले जात आहे. जेटीच्या वादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पर्यायी स्वतंत्र जेटी उभारण्याकरिता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे पाठपुरावा केला आहे. या कामासाठी सुमारे 50 ते 60 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्गात रोजगारनिर्मितीसाठी विविध प्रकल्प
देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विविध प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले. रत्नागिरी परिसरातील गोवा शिपयार्डच्या विस्तार प्रकल्पाचे काम जानेवारी 2028 पासून सुरू होण्याची अपेक्षा असून, त्यातून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
देवगडमधील तरुण प्रांजल कुलकर्णी याची फ्लाय दुबई विमान कंपनीत पायलट म्हणून निवड झाल्याचा उल्लेख करत देवगडच्या तरुणांमध्ये मोठी क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितले. देवगडचा विकास आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत, पुढील काळातही नागरिकांनी विकासकामांसाठी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. देवगडचा कायापालट केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या भूमिपूजन सोहळ्याला माजी आमदार अजित गोगटे, नंदकुमार घाटे, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, गटनेते शरद ठूकरूल, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, इंजिनिअर अभिजित कामत, उल्हास मणचेकर, प्रकाश राणे, महेश ताम्हणकर, सुभाष कुलकर्णी, अजयकुमार सर्वगोड, डॉ. सुनील आठवले, देवगड पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष उगलमुगले आदी उपस्थित होते.
तसेच सार्वजनिक बांधकाम मंडळ तथा सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल, सार्वजनिक बांधकाम विभाग देवगडचे उपविभागीय अभियंता शैलेश मोरजकर, कनिष्ठ अभियंता अविनाश पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.