For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवगडच्या पर्यटनाला ‘सेल्फी म्युझियम’ची नवी झळाळी; सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

देवगडच्या पर्यटनाला ‘सेल्फी म्युझियम’ची नवी झळाळी  सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणेंच्या हस्ते उद्घाटन
Advertisement

devgad-selfie-museum-new-tourism-attraction-flying-konkan

Advertisement

देवगड / प्रतिनिधी : देवगड येथे ‘फ्लाईंग कोकण’च्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या ‘सेल्फी म्युझियम’चे उद्घाटन राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या अभिनव उपक्रमामुळे देवगडच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नीतेश राणे यांनी व्यक्त केला.

पर्यटकांचा दृष्टिकोन केवळ एखादे पर्यटनस्थळ पाहण्यापुरता मर्यादित न राहता त्यांना फोटो, सोशल मीडिया आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव मिळावा, या उद्देशाने ‘सेल्फी म्युझियम’ची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पामागील संकल्पना वाखाणण्याजोगी असल्याचे राणे यांनी सांगितले.

Advertisement

यावेळी भाजपचे बाळ खडपे, जिल्हा बँक संचालक अॅड. प्रकाश बोडस, देवगड अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश राणे, युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगावकर, संतोष किंजवडेकर, भाजपचे शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, यश रानडे, निनाद देशपांडे, सेल्फी म्युझियमचे श्रीकांत जोईल आदी उपस्थित होते.

श्रीकांत जोईल यांनी सांगितले की, देवगड किल्ला, समुद्रकिनारा, आंबा आणि निसर्ग यासोबतच पर्यटकांना आधुनिक व सोशल मीडिया फ्रेंडली अनुभव देण्याचा ‘फ्लाईंग कोकण’चा प्रयत्न आहे. सेल्फी म्युझियममधील बॅकड्रॉप्स, थीम्स, प्रॉप्स आणि फोटोझोन वेळोवेळी बदलण्यात येणार असून, त्यामुळे पर्यटकांना प्रत्येक भेटीत नवा अनुभव घेता येईल.

‘फ्लाईंग कोकण’च्या माध्यमातून यापूर्वी झिपलाईनसारख्या उपक्रमातून साहसी पर्यटनाला चालना देण्यात आली आहे. आता सेल्फी म्युझियमच्या माध्यमातून कुटुंबे, युवा वर्ग, मुले, पर्यटक तसेच सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स यांच्यासाठी नवे आकर्षण निर्माण करण्यात आले आहे.

या उपक्रमांमुळे देवगडमध्ये पर्यटकांचा मुक्काम वाढावा आणि स्थानिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दुकानदार, वाहतूक व्यवसाय तसेच इतर पर्यटनपूरक व्यवसायांना त्याचा लाभ मिळावा, हा उद्देश असल्याचे जोईल यांनी स्पष्ट केले. देवगडची ओळख केवळ आंबा आणि समुद्रकिनाऱ्यांपुरती मर्यादित न राहता निसर्ग, साहस, मनोरंजन आणि नवीन अनुभवांचे पर्यटनस्थळ म्हणून निर्माण व्हावी, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

या प्रकल्पामुळे थेट रोजगारनिर्मितीसोबतच फोटोग्राफी, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, स्थानिक वाहतूक, खाद्यपदार्थ, हॉटेल्स आणि अन्य पर्यटन व्यवसायांनाही अप्रत्यक्ष फायदा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, सेल्फी म्युझियमच्या व्यापक मार्केटिंगवर विशेष भर देण्याची सूचना नीतेश राणे यांनी केली. ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमांतून या उपक्रमाची प्रभावी प्रसिद्धी करावी. मोक्याच्या ठिकाणी प्रकल्पाची माहिती देणारे होर्डिंग्ज उभारल्यास अधिकाधिक पर्यटक आणि नागरिकांपर्यंत माहिती पोहोचेल आणि या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल, असे राणे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.