युवा महोत्सवातील ‘ओव्हरऑल चॅम्पियन’ श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचा मुंबई विद्यापीठात भव्य सन्मान
देवगड : मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवा महोत्सवात नृत्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करत लोकनृत्य प्रकारात सुवर्णपदकासह ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ पटकावणाऱ्या देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचा मुंबई विद्यापीठात भव्य सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये झालेल्या ५८व्या युवा महोत्सवात श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाने नृत्य विभागात दमदार कामगिरी केली होती. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ५९व्या युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते महाविद्यालयाला भव्य ट्रॉफी, राजाबाई टॉवरची प्रतिकृती आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
या सन्मान सोहळ्याला श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक सहसमन्वयक डॉ. नितीन वळंजू तसेच विद्यार्थी साहिल जाधव उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक सहसमन्वयक तसेच श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. नितीन वळंजू यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाने युवा महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लोकनृत्यात मिळविलेले सुवर्णपदक आणि त्यानंतरची ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ ही महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या उत्कृष्ट कार्याची पावती मानली जात आहे.
या यशाबद्दल शिक्षण विकास मंडळ, देवगडचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.