देवगड, रत्नागिरी हापूस राहणार ‘तेजीत’
थ्रीप्सी किडीच्या प्रादुर्भावामुळे आंब्याच्या मोहर करपला
बागायतदारांना फटका, उत्पादन ६०ते ७० टक्क्यांनी घटले
यंदाच्या हंगामात सर्वसामान्यांसाठी हापूसचा गोडवा महागणार
कोल्हापूरः धीरज बरगे
गोवा ते रत्नगिरीपर्यंतच्या कोकण पट्ट्यात डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या पावसाचा फटका येथील हापूस आंबा बागायतदारांना बसला आहे. पाऊस, थंडी, ऊन असे एकाच महिन्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे आंब्याच्या झाडांना आलेल्या मोहरवर थ्रीप्सी किडीचा प्रादुर्भाव पडला. यामुळे मोहर करपून गळून पडला. किडीच्या प्रादुर्भावाचा फटका हापूस बागायतदारांना बसला असून उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात देवगड, रत्नागिरी हापूस तेजीत राहणार आहे. संपूर्ण हंगामात हापूस आंब्याचे दर चढेच राहणार असल्याने यंदा सर्वसामान्य नागरिकांसाठी हापूसची चव महागणार आहे.
कोकणातील सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड, सिंधूदूर्ग, वेंगूर्ला, मालवण, रत्नागिरी, चिपळूण, खेड आदी परिसरातून देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याची राज्यासह देशात, परदेशात हापूस आंब्याची निर्यात केली जाते. यंदा सुरवातीच्या टप्प्यात कोकण परिसरात हापूस आंब्यासाठी पोषक वातावरण होते. आंबा झाडांना मोहर देखिल चांगला आला होता. त्यामुळे हंगामात हापूस आंब्याचे उत्पादन मोठयाप्रमाणात होईल, असा अंदाज बागायतदारांचा होता. मात्र डिसेंबर २०२४ मध्ये संपूर्ण कोकण पट्ट्यात सलग तीन दिवस पाऊस झाला. तसेच सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन असे वातावरण राहिले. वातावरणातील या बदलामुळे थ्रीप्सी किडीचा प्रादुर्भाव मोहरवर पडला. किडीवर ठोस असे औषध नसल्याने मोठ्या प्रमाणात मोहर करपून गेला. त्यामुळे आंबा उत्पादना मोठी घट झाली असून अनेक बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बागेच्या देखभालीवर १० ते ५० लाखांपर्यंत खर्च
आंबाच्या बागेची देखभाल, झाडांवर औषध फवारणी यासाठी बागेच्या क्षेत्रफळानुसार बागायतदारांचे सुमोरे १० ते ५० लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. मात्र मोहर, फळ गळतीमुळे यंदा उत्पादनात मोठ्याप्रमणात घट होणार हे निश्चित असल्याने बागेवर केलेल्या खर्चा इतपत तरी उत्पन्न मिळेल का नाही याची शाश्वती नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
मोहर पाठोपाठ फळ गळतीचा फटका
थ्रीप्सी किडीच्या प्रादुर्भावामुळे मोहर गळतीचा फटका बसला. तर सध्या कोकणात सकाळी थंडी तर नऊ-दहा वाजल्यानंतर तापमानात होणाऱ्या वाढीमुळे आता फळ गळती सुरु झाली आहे. त्यामुळे फळ पूर्णत: तयार होईपर्यंत कितपत आंबा झाडावर शिल्लक राहिल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मोहर पाठोपाठ सध्या सुरु असलेल्या फळ गळतीने बागायतदारांचे टेन्शन आणखी वाढवले आहे.
हापूसचे दर राहणार चढेच
मार्च महिन्यापासून बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसचा दर सरासरी ६००ते ८०० रुपये डझन असा राहतो. मात्र यंदा हापूसच दर १२०० ते १५०० रुपये डझन असा राहणार आहे. तसेच मे महिन्यातही २०० ते ३०० रुपयांपर्यंत असणारा हापूसच दर ५०० रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा हापूसचे दर चढेच राहणार आहेत.
कोल्हापूर बाजार समितीत आवक घटली
कोकणातून कोल्हापूर बाजार समितीमध्येही मोठया प्रमणात हापूस आंब्याची आवाक होते. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजार समितीमध्ये होणाऱ्या हापूस आंब्याच्या आवकमध्येही ७० टक्के घट झाली आहे.
आंबा बागायतदार आर्थिक संकटात
थ्रीप्सी किड नियंत्रणासाठी ठोस असे औषध नसल्याने या किडीचा फटका बसला आहे. तसेच सध्या सकाळी थंडी, नंतर उष्णता अशा वातावरणातील बदला मुळे फळगळती सुरु आहे. अपेक्षेपेक्षा 30 ते 35 टक्केच आंबा हाताला लागेल अशी अपेक्षा आहे. अशी परिस्थिती बहुतांश बागायतदारांची असल्याने यंदा बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
आमित शिंदे, आंबा बागायतदार शिरगांव देवगड
आवक कमी, दर वाढणार
मार्च महिन्यात दिवसाकाठी एक हजार ते बाराशे हापूस आंब बॉक्सची आवक होते. यंदा ही आवक २०० ते २५० बॉक्सवर आली आहे. कोकणात आंबा उत्पादन कमी असल्याने यंदा आवक कमी राहणार आहे. एप्रिल-मे महिन्यात सर्वसामान्यांच्या आवाक्यात दर येतात. यंदा मात्र या काळातही दर वाढीवच राहणार आहे.
प्रसाद वळंजू, आंबा व्यापारी कोल्हापूर बाजार समिती.