For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवगड पंचायत समितीतर्फे ३ सप्टेंबरला जनता दरबार; विविध विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित

देवगड पंचायत समितीतर्फे ३ सप्टेंबरला जनता दरबार  विविध विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित
Advertisement

देवगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी देवगड पंचायत समितीतर्फे गुरुवार, 3 सप्टेंबर 2026 रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Advertisement

हा जनता दरबार सकाळी 10 वाजता इंद्रप्रस्थ हॉल, सातपायरी, जामसंडे, ता. देवगड येथे होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर संबंधित विभागांकडून तत्काळ कार्यवाही व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या जनता दरबारासाठी एसटी महामंडळ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अन्य संबंधित विभागांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे आणि उपसभापती अमोल लोके यांच्या पुढाकारातून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याने नागरिकांना आपल्या समस्या आणि तक्रारी थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. संबंधित समस्यांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक, वीजपुरवठा, रस्ते आणि अन्य नागरी सुविधांशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता हा जनता दरबार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी घेऊन जनता दरबारास उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड पंचायत समितीतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.