देवगड-कुडाळ आणि आचरा-भगवंतगड एसटी बसफेऱ्या कायमस्वरूपी सुरू करा; माजी सभापती अशोक बागवेंची मागणी
देवगड आगारातून सकाळी 7.30 वाजता सुटणारी बस कुडाळ आगारात जाते. तसेच रात्री कुडोपी येथे मुक्कामी असलेली दुसरी बस सकाळी 7 वाजता आचरा येथून भगवंतगडच्या दिशेने रवाना होते. ही बस चिंदर पालकरवाडी, भटवाडी आणि लब्देवाडीमार्गे भगवंतगड येथे पोहोचते. या दोन्ही बसफेऱ्या सध्या शालेय फेऱ्या म्हणून चालविल्या जातात.
मात्र, शाळांना सुट्टी असलेल्या दिवशी या बसफेऱ्या बंद ठेवल्या जातात. परिणामी, या बससेवेवर अवलंबून असलेल्या विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी प्रवासासाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या दोन्ही बसफेऱ्या केवळ शालेय दिवसांपुरत्या मर्यादित न ठेवता वर्षभर कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
देवगड-कुडाळ बसफेरीसाठी माजी सभापती अशोक बागवे यांनी, तर आचरा-भगवंतगड बसफेरीसाठी चिंदर ग्रामपंचायतीने स्वतंत्र निवेदन सादर केले. यावेळी विभाग नियंत्रक प्रदीप घोडे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन विभाग नियंत्रकांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली. तसेच विभाग वाहतूक अधिकारी देशमुख यांना या संदर्भात तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
या मागणीसाठी उद्योजक प्रकाश मेस्त्री, अनिल सावंत, चिंदर ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामपंचायतीचे वरिष्ठ कर्मचारी विश्राम माळगांवकर यांचे सहकार्य लाभले. आता एसटी प्रशासनाकडून या दोन्ही बसफेऱ्या कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे परिसरातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
